scorecardresearch

कुतूब मिनारमधील गणेशमूर्ती हलविण्याच्या हालचाली; राष्ट्रीय संग्रहालयात नेण्याची राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाची सूचना

कुतूब मिनार परिसरातील दोन गणेशमूर्ती राष्ट्रीय संग्रहालयात नेण्यात याव्यात, अशी सूचना राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने (एनएमए) भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाला (एएसआय) केली आहे.

एक्सप्रेस वृत्तसेवा, नवी दिल्ली : कुतूब मिनार परिसरातील दोन गणेशमूर्ती राष्ट्रीय संग्रहालयात नेण्यात याव्यात, अशी सूचना राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने (एनएमए) भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाला (एएसआय) केली आहे. या ठिकाणी मूर्ती ठेवणे हे अवमानकारक असल्याचे प्राधिकरणाच्या अध्यक्षांनी म्हटले आहे. अशा पुरातन वस्तू राष्ट्रीय संग्रहालयात प्रदर्शित करण्याची तरतूद असून, त्या ठिकाणी या मूर्तीना‘प्रतिष्ठित’ जागा दिली जावी असे ‘एएसआय’ला गेल्या महिन्यात पाठवलेल्या पत्रात ‘एनएमए’ने म्हटले असल्याची माहिती आहे. या दोन्ही संस्था केंद्रीय संस्कृती मंत्रालयांतर्गत काम करतात.

याप्रकरणी पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. भाजप नेते आणि राज्यसभेचे माजी खासदार असलेले राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाचे प्रमुख तरुण विजय यांनी असे पत्र पाठवण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. ‘मी या ठिकाणाला अनेकदा भेट दिली असून, तेथे मूर्ती ठेवल्या जाणे हे त्या मूर्तीबाबत अवमानकारक असल्याचे मला जाणवले. या मूर्तीची जागा मशिदीला भेट देण्यासाठी येणाऱ्यांच्या पायाजवळ येते’, असा आक्षेप त्यांनी व्यक्त केला. देशातील स्मारके व स्मारकस्थळे आणि त्यांच्याभोवतीचा परिसर यांचे संरक्षण व संवर्धन यासाठी २०११ साली राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली होती.

थोडा इतिहास..

बाराव्या शतकात मोहम्मद घोरीने दिल्लीचा शासक म्हणून नेमलेल्या कुतुबुद्दीन ऐबक याने कुतूब मिनारची निर्मिती केली. ऐबकाने कुतूब मिनारच्या परिसरातील २७ मंदिरांना अंशत: नष्ट करून तेथे नवी वास्तू उभारल्याचा इतिहास आहे. त्याच ठिकाणी तेव्हापासून या दोन गणेशमूर्ती आहेत.  येथील मंदिरांमध्ये पूजा करण्याची मागणी गेली अनेक वर्षे केली जात आहे.

स्वातंत्र्यानंतर वसाहतवादाच्या खुणा पुसण्यासाठी आपण ब्रिटिश सम्राट व सम्राज्ञी यांचे पुतळे इंडिया गेटवरून हटवले, तसेच रस्त्यांची नावे बदलली. आता मोगल सम्राटांकरवी हिंदूना जो सांस्कृतिक वंशविच्छेदाचा सामना करावा लागला, तो उलट फिरवण्यासाठी आपण काम करायला हवे

– तरुण विजय, राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाचे प्रमुख.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Movements move ganesh idols qutub minar notice national monuments authority national museum ysh

ताज्या बातम्या