Asaduddin Owaisi On Asim Munir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. मात्र, तरी देखील पाकिस्तानमधील काही नेते भारताविरोधात गरळ ओकत आहेत. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख तथा फील्ड मार्शल असीम मुनीर हे भारताच्या विरोधात वेगवेगळी विधाने करत भारताला अणू हल्ल्याच्या धमक्या देत आहेत.
दरम्यान, बिलावल भुट्टो आणि असीम मुनीर यांच्या विधानाला भारतानेही जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. असीम मुनीर यांनी भारताला दिलेल्या अणू हल्ल्याच्या धमकीनंतर आता खासदार असदुद्दीन ओवैसी हे त्यांच्यावर चांगलेच भडकले आहेत. असीम मुनीर यांचा उल्लेख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी ‘सडकछाप आदमी’ असा करत पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे. या संदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.
असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले?
असीम मुनीर यांच्या धमकीसंदर्भात बोलताना असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं की, “पाकिस्तानी लष्करप्रमुखांचे शब्द आणि त्यांच्या धमक्या निंदनीय आहेत. मात्र, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ते अमेरिकेत बसून बोलत आहे. अमेरिका भारताचा धोरणात्मक भागीदार आहे. तरीही असीम मुनीर हे सडकछाप माणसाप्रमाणे बोलत आहेत. आपल्याला हे देखील समजून घेणं आवश्यक आहे की पाकिस्तानी लष्कराकडून आणि त्यांच्या काही राज्याकडून आपल्याला कायम धोका राहू शकतो. त्यामुळे आपल्याला आपलं संरक्षण बजेट वाढवावं लागेल, जेणेकरून आपण तयार राहू शकू”, असं खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे.
असीम मुनीर यांनी काय म्हटलं होतं?
पाकिस्तानचे लष्करप्रमुख तथा फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी अमेरिकेत एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं होतं की, “आपण एक अणुशक्ती-संपन्न राष्ट्र आहोत. जर आपल्याला वाटलं की आपण बुडत आहोत, तर आपण अर्धे जग आपल्यासोबत घेऊन बुडू”, असं विधान असीम मुनीर यांनी केलं होतं.
#WATCH | Delhi: On Pakistan Army Chief Asim Munir’s nuclear threat, AIMIM MP Asaduddin Owaisi says, "Pakistan Army Chief's words and his threats are condemnable. What's unfortunate is that this is happening from the US, which is India's strategic partner. He is speaking like a… pic.twitter.com/tyje89ai0e
— ANI (@ANI) August 12, 2025
“आम्ही बुडालोच तर…”; असीम मुनीर पुन्हा बरळले
अमेरिकेतील टाम्पा शहरात पाकिस्तानी वंशाच्या लोकांसाठी डिनरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी असीम मुनीर म्हणाले आता जर संघर्ष सुरु झाला तर भारताच्या पूर्व भागापासून सुरुवात करत आपण पश्चिमेच्या दिशेने जाऊ. मुकेश अंबानी यांची जामनगरमध्ये जी रिफायनरी आहे ती जगातली सर्वात मोठी रिफायनरी आहे. या रिफायनरीवर हल्ला करु. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. पाकिस्तान हा न्यूक्लिअर शक्ती असलेला देश आहे. आपण अर्धे जग घेऊन तर बुडूच पण जर आम्हाला बुडवण्याचा प्रयत्न झाला तर पहिला हल्ला रिलायन्सच्या जामनगरमधील रिफायनरीवर करण्यात येईल अशी धमकीच असीम मुनीर यांनी दिली.