मध्य प्रदेश सरकार पंतप्रधान मोदींच्या ४ तासांच्या भेटीसाठी २३ कोटी रुपये खर्च करणार, कारण…

पंतप्रधान मोदींची भोपाळ भेट ४ तासांची असणार आहे. मात्र, यावर मध्य प्रदेश सरकार तब्बल २३ कोटी रुपये खर्च करणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये येणार आहे. मध्य प्रदेश सरकार आदिवासी योद्धा बिरसा मुंडा यांच्या स्मृतीप्रित्यार्थ जनजाती गौरव दिवस साजरा करणार आहे. यासाठी मोदी आवर्जून उपस्थित राहणार आहेत. त्यांची ही भोपाळ भेट ४ तासांची असणार आहे. मात्र, यावर मध्य प्रदेश सरकार तब्बल २३ कोटी रुपये खर्च करणार आहे. या ४ तासांपैकी ते १ तास १५ मिनिटं स्टेजवर असतील. यासाठी खास ५ डोम्स बांधण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमावरील २३ कोटी रुपये खर्चापैकी तब्बल १३ कोटी रुपये केवळ कार्यक्रमाच्या ठिकाणी लोकांच्या वाहतुकीवरच खर्च होणार आहेत. हा कार्यक्रम १५ नोव्हेंबरला भोपाळमधील जंबोरी मैदानात पार पडणार आहे. यावेळी मोदी उपस्थितांना संबोधन करतील. तसेच देशातील पहिलं खासगी-सार्वजनिक भागिदारीतून तयार झालेल्या हबीबगंज रेल्वेस्थानकाचं लोकार्पण करणार आहेत. याशिवाय १५ ते २२ नोव्हेंबर या काळात राष्ट्रीय स्तरावर जनजातीय गौरव सप्ताह देखील साजरा केला जाणार आहे. यात स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांच्या योगदानाला उजाळा दिला जाणार आहे.

“कार्यक्रमाच्या तयारीसाठी ३०० कामगार आठवडाभर काम करणार”

या कार्यक्रमाच्या तयारीसाठी जवळपास ३०० कामगार आठवडाभर काम करतील. मोठमोठे पंडाल (डोम्स) बांधण्यात येणार आहेत. ५२ जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची वाहतूक, जेवण आणि राहण्याच्या व्यवस्थेसाठी १२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय. ९ कोटी रुपये ५ डोम्स, टेंट निर्मिती, सजावट आणि प्रसिद्धीसाठी आहेत.

हेही वाचा : “दुसऱ्यांना उखडता-उखडता एक दिवस…”; शिवसेनेनं मोदी, नड्डांना सुनावलं

मध्य प्रदेशमध्ये एकूण ४७ जागा अनुसुचित जमातींसाठी राखीव आहेत. यापैकी भाजपाला २००८ मध्ये २९, २०१३ मध्ये ३१, २०१८ मध्ये केवळ १६ जागा जिंकता आल्या. त्यामुळेच भाजपा यावर भर देत असल्याचा तर्क लावला जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mp shivraj government going to spend 23 crore for 4 hours pm modi visit pbs

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना
ताज्या बातम्या