भारतीय जनता पार्टीचे पीलीभीतचे खासदार वरुण गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. वरुण गांधींनी राष्ट्रीयकृत बँकांच्या खासगीकरणाला विरोध करतानाच अॅमेझॉन, फ्लिपकार्टवर टीका केलीय. शेतकऱ्यांच्या हितासाठी केवळ मी उभा आहे. इतर कोणत्याही खासदाराने याविरोधात उभं राहण्याची हिंमत दाखवली नाही, असं वरुण गांधी म्हणाले आहेत.
बरेलीमधील बहेडी येथे वेगवेगळ्या गावांमध्ये स्थानिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी वरुण गांधी सध्या दौरा करत आहेत. याचवेळी एका ठिकाणी बोलताना वरुण गांधी यांनी बँकांच्या खासगीकरणाला विरोध करत केंद्रावर निशाणा साधला. “बँकांचे खासगीकरण झालं तर १० लाख लोक बेरोजगार होतील. त्यांना पुन्हा नोकऱ्या कोण देणार? त्यांच्या मुलांच्या अन्नपाण्याची सोय कोण करणार? जर बीएसएनएस, एमटीएनएल, विमानतळं, विमान कंपन्या असं सगळं काही विकून टाकलं तर सामान्य माणसाच्या मुलांना नोकऱ्या कोण देणार?,” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
“आज एखादी सर्वसामान्य व्यक्ती नोकरी मिळवण्यासाठी अर्ज करते तेव्हा तिच्याकडे तिच्या कौशल्याबद्दल विचारपूस केली जात नाही, तर तू लाच किती देऊ शकतो असं विचारलं जातं. तू कोणाच्या शिफारशीने आलाय हे विचारलं जातं. यासारख्या गोष्टी आपल्या देशाला वाळवीप्रमाणे पोखरत असून कमकुवत करत आहेत. येत्या काळात सर्वसामान्यांना नोकऱ्या शोधताना अडचणी निर्माण होणार आहेत,” असंही वरुण गांधी म्हणाले.
शेतकऱ्यांना कर्ज घेताना अनेक कागदपत्रं द्यावी लागतात. मात्र १० हजार कोटींचं कर्ज घेणाऱ्यांकडून कागदपत्रांची मागणी केली जात नाही. अशी मोठी कर्ज दिली जात नाही तेव्हा ५० टक्के रक्कम द्यावी असं सांगितलं जातं. या उलट सर्वसामान्यांकडून कर्जाची वसुली करताना अगदी त्यांच्या घराचाही लिलाव केला जातो, त्यांचा सर्वांसमोर अपमान केला जातो; असा टोलाही वरुण गांधींनी लगावला.
“शेतकऱ्यांसाठीच्या या लढ्यात तुम्ही सुद्धा मला साथ द्यावी अशी माझी इच्छा आहे. आज अनेकजण आपल्या स्वार्थासाठी राजकारण करत आहेत. ज्यांच्या पायांमध्ये चप्पल नाही असे लोक आज मोठंमोठी घरं बांधत आहेत, कॉलिनी उभारत आहेत. मात्र वरुण गांधी आजही त्याच गाडीत आलाय ज्या गाडीत निवडणूक प्रचारादरम्यान आला होता. तसेच भविष्यातही तो याच गाडीने तुमच्यापर्यंत पोहचेल,” असं वरुण गांधींनी गावकऱ्यांसमोर दिलेल्या भाषणात म्हटलं. गावांमध्ये करोनाच्या संकटाच्या कालावधीमध्ये ऑक्सिजन, औषधं, खाण्याची पाकिटं यासारख्या आवश्यक गोष्टी मी स्वत:च्या पैशामधून पुरवल्याचंही वरुण गांधींनी सांगितलं.