भारताचा माजी कर्णधार आणि सध्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करणाऱ्या महेंद्रसिंह धोनीच्या घरात एका नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. धोनीची पत्नी साक्षीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत तिने आपल्या घरी नवीन पाहुण्याचे स्वागत केले आहे. साक्षीने माहिती दिली, की चेतक नावाचा घोडा त्याच्या घरी आला आहे, जो खूपच गोंडस आणि सुंदर आहे.
साक्षीने इंस्टाग्रामवर दोन व्हिडिओ शेअर करताना चेतकची सर्वांना ओळख करून दिली. धोनीच्या घरात आधीपासूनच श्वान आहेत. आता यात चेतक घोडाही त्याच्या कुटूंबात सामील झाला आहे. रांची येथील आपल्या घरात धोनीची पत्नी सध्या नवीन पाहुण्याबरोबर मिसळताना दिसली आहे.
View this post on Instagram
साक्षी धोनीने चेतक घोड्याचे दोन व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केले आणि त्यात लिहिले, की चेतक आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये चेतक धोनीच्या श्वानासोबत खेळताना दिसत आहे.
धोनीच्या संघात करोनाची एन्ट्री
भारतात सुरू असलेल्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामावर सध्या करोनाचे सावट गडद होत चालले आहे. कोलकाता संघातील दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्यानंतर आता चेन्नई सुपर किंग्जच्या (सीएसके) संघातही करोनाने ‘एन्ट्री’ घेतली आहे. चेन्नईच्या तीन सदस्यांना करोनाची लागण झाली आहे. Espn Cricinfoने दिलेल्या वृत्तानुसार, सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि बसचा क्लीनर यांना करोनाने ग्रासले आहे. याव्यतिरिक्त दिल्लीत असलेला उर्वरित संघ करोना चाचणीत निगेटिव्ह आढळला आहे. या सर्वांची शेवटची चाचणी रविवारी घेण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल आता समोर आला आहे.