नवी दिल्ली : महाराष्ट्र ते साबरमती हा संपूर्ण बुलेट ट्रेन प्रकल्प डिसेंबर २०२९पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी संसदेला दिली. सध्या गुजरातमध्ये वापी ते साबरमतीदरम्यान रेल्वे कॉरिडॉरचे काम सुरू असून ते डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे वैष्णव यांनी लोकसभेला दिलेल्या लेखी उत्तरामध्ये नमूद करण्यात आले आहे.

देशातील आतापर्यंतच्या सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या सध्याच्या बांधकाम स्थितीबद्दल काही सदस्यांनी प्रश्न विचारले होते. त्याला उत्तर देताना वैष्णव यांनी सांगितले की, ५०८ किलोमीटर लांबीच्या ‘मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल’ (एमएएचएसआर) प्रकल्पाचे (बुलेट ट्रेन) काम जपानच्या तांत्रिक व आर्थिक मदतीने सुरू आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही रेल्वे गुजरात, महाराष्ट्र आणि दादरा व नगरहवेलीमधून जाणार असून त्यावर मुंबई, ठाणे, विरार, बोइसर, वापी, बिलिमोरिया, सुरत, भरुच, बडोदा, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती ही १२ स्थानके आहेत. वैष्णव यांनी माहिती दिली की, हा अतिशय गुंतागुंतीचा आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प आहे. त्याच्याशी संबंधित सर्व स्थापत्य बांधकाम, रेल्वेरूळ, विद्याुत, सिग्नल, दूरसंचार आणि रेल्वेसंचाचा पुरवठा पूर्ण झाल्यानंतरच तो नेमका कधी पूर्ण होईल ते सांगता येईल, असे वैष्णव यांनी स्पष्ट केले.