गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हत्यांचं सत्र चालू आहे. पठाणकोट हल्ला, मुंबईवरील दहशतवादी हल्ला, दिल्लीतल्या संसदेवरील हल्ल्यात अथवा त्या कटात सामील असलेल्या दहशतवाद्यांच्या हत्या होत आहेत. सोमवारी असाच एक हत्येचा प्रयत्न झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. काही अज्ञात लोकांनी लष्कर-ए-तैय्यबा या दहशतवादी संघटनेतील अतिरेकी साजिद मीर याची हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मीर याला विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाला असून तो सध्या व्हेंटिलेटरवर आहे.
साजिद मीर हा २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्यांपैकी एक होता. तो लाहोरच्या मध्यवर्थी कारागृहात असून त्याला जेवणातून विष देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. साजिद मीरवर विषप्रयोग झाल्यानंतर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयने त्याला तुरुंगातून थेट रुग्णालयापर्यंत एअरलिफ्ट केलं. त्याच्यावर सध्या बहावलपूरमधील रुग्णालयात उपचार चालू आहेत.
साजिद मीरवरील विषप्रयोगानंतर तुरुंगातल्या कैद्यांसाठी जेवण बनवणाऱ्या स्वयंपाक्यावर संशय व्यक्त केला जात आहे. तो सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हा एक खासगी स्वयंपाकी असून ऑक्टोबर २०२३ पासून तो तुरुंगातील कैद्यांसाठी जेवण बनवतोय.
साजिद मीर हा २६/११ च्या मुंबईवरील हल्ल्याचा कट रचणाऱ्या मास्टरमाईंड्सपैकी एक आहे. काही दिवसांपूर्वी त्याला लाहोरच्या मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आलं होतं. साजिद मीर हा अमेरिकेच्या मोस्ट वॉन्टेड यादीत आहे. साजिदचं वय ४० ते ५० वर्षांदरम्यान आहे. त्याच्यावर अमेरिकेने ५ मिलियन डॉलर्सचं (४१.६८ कोटी रुपये) बक्षीस ठेवलं आहे. जून २०२२ मध्ये त्याला टेरर फंडिंगप्रकरणी (दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरवल्याप्रकरणी) पाकिस्तानातील दहशतवादविरोधी न्यायालयाने शिक्षा सुनावली होती.
हे ही वाचा >> VIDEO : “रस्त्यावर मांसाहारी पदार्थ विकणारी दुकानं हटवा,” निवडून येताच भाजपा आमदाराची अधिकाऱ्याला तंबी
‘लष्कर’च्या माजी कमांडरची अज्ञात हल्लेखोरांकडून हत्या
लष्कर-ए-तैयबाचा माजी कमांडर अकरम खान उर्फ अकरम गाझी याची गेल्या महिन्यात पाकिस्तानात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. २०१८ ते २०२० या तीन वर्षाच्या काळात तो लष्करमध्ये तरुणांना भरती करण्याचं काम करत होता. ९ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानच्या बाजौर भागात अज्ञात हल्लेखोरांनी त्याची गोळ्या घालून हत्या केली. अकरम हा लष्करच्या काही वरिष्ठ कमांडर्सपैकी एक होता. अनेक वर्ष तो भारतविरोधी दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता.
गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानात दहशतवादी संघटनांशी संबंधित, भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांच्या हत्याचं सत्र सुरू आहे. अकरम गाझीची हत्या होण्यापूर्वी अलिकडच्या काही महिन्यांमध्ये मुफ्ती कैसर फारूक, खलिस्तानी दहशतवादी परमजीत सिंग पंजवड, एजाज अहमद अहंगर, बशीर अहमद पीरसारख्या काही दहशतवाद्यांच्या अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केल्या आहेत.