हिमाचल प्रेदशातील चंबा जिल्ह्यात २१ वर्षीय पशुपालकाच्या निर्घृण हत्येमुळे तिथे तणाव निर्माण झाला आहे. याप्रकरणी संताप व्यक्त करण्यासाठी गुरुवारी संघनी गावातील जमावाने आरोपींची दोन घरेही जाळली.

४० वर्षीय मुसाफिर हुसेन याने २१ वर्षीय मनोहर या पशुपालकाची हत्या केली. मनोहरचे मुसाफिरच्या अल्पवयीन भाचीसोबत संबंध होते, या संशयातून त्याची हत्या करण्यात आली, असं पोलिसांनी सांगितलं. या घटनेमुळे तिथे तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणी ११ जणांना पोलिसांनी अटक केली असून यामध्ये चार अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. या अल्पवयीन मुलांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. तसंच, या गुन्ह्यातील सर्व शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

मनोहर हा तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. त्याचे वडील मेंढपाळ आहेत. मनोहर इयत्ता दहावी शिकलेला असून तो मेंढ्यांना चरायला घेऊन गेला होता. मात्र, तेव्हापासून म्हणजेच, ६ जूनपासून तो बेपत्ता होता. परंतु, तीन दिवसांनंतर त्याचा मृतदेह नाल्यात टाकलेल्या पोत्यात सापडला. एवढंच नव्हे तर मनोहरची हत्या करून मृतदेह नाल्यात टाकण्यापूर्वी त्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले होते. त्यामुळे त्याचा मृतदेह तीन पोत्यांतील अवशेषांमध्ये सापडला. याप्रकरणी चंबा येथील किहार पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणामुळे हजारोंचा जमाव किहार पोलीस ठाण्याच्या बाहेर जमा झाला होता. या जमावाने सरकारी वाहनांचे नुकसान केले आणि संघनी गावाच्या दिशेने कूच केली. येथे या जमावाने हुसेनचं घर पेटवलं. “अल्पसंख्याक समुदाय (मुस्लिम समाज) गेल्या काही दशकांपासून येथे राहत आहेत. ते या समाजाचा भाग आहेत. पण या घटनेने आमच्या विश्वासाला तडा गेला आहे. ज्या क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली ते तणावाचे मुख्य कारण आहे”, असी माहिती सलुनी येथील सरकारी कर्मचाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेमुळे गावात तणावस्थिती निर्माण झाल्याने या भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर, मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी शांततेचे आवाहन केले आहे. तर, विरोधी पक्षनेते जय राम ठाकूर यांनी एनआयए तपासाची मागणी केली आहे. कारण, या प्रकरणातील आरोपी हुसेन हा १९९८ साली झालेल्या गोळीबारातही दोषी होता. त्याने केलेल्या गोळीबारात ३५ जणांना ठार केले होते.