कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात बुधवारी एक अमानुष घटना घडली आहे. येथील एका २० वर्षीय मुस्लीम तरुणाला एका टोळक्याने बेदम मारहाण केली. पीडित तरुण एका वेगळ्या धर्मातील अल्पवयीन मुलीशी बोलल्याच्या कारणावरून ही मारहाण करण्यात आली आहे.
याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हल्लेखोरांविरुद्ध मोरल पोलिसिंग अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर मारहाण झालेल्या मुस्लीम तरुणाविरुद्ध पोक्सोअंतर्गत (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, २० वर्षीय मुस्लीम तरुण हाफीद आणि १७ वर्षीय हिंदू मुलगी यांची एक वर्षापूर्वी सोशल मीडिया अॅप इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली होती. ते अनेकदा सुब्रमण्य केएसआरटीसी बसस्थानकाजवळ भेटत असत. घटनेच्या दिवशी ५ जानेवारी रोजीही ते बसस्थानकावर भेटले होते. संबंधित तरुण मुलीशी बोलत होता. त्यावेळी अचानक काही जणांनी तरुणाचं जीपमधून अपहरण केलं आणि त्याला निर्जनस्थळी नेऊन बेदम मारहाण केली. तसेच चाकुचा धाक दाखवत पुन्हा त्या मुलीकडे पाहायचं नाही, अशी धमकी दिली.
हेही वाचा- हृदयद्रावक: फिफा विश्वचषकाचा आनंद क्षणात विरला, मुंबईत पाचव्या मजल्यावरून पडून चिमुकल्याचा अंत
या प्रकारानंतर सुब्रमण्य पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी मुलीच्या वडिलांनीही हाफीदविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, “हाफीद मुलीकडे तिचा फोन नंबर मागत होता. पण तिने फोन नंबर देण्यास नकार दिल्याने हाफीदने तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.”