प्रत्येक बहीण-भावाच्या मनातील हळवा कोपरा म्हणजे रक्षाबंधनाचा सण. गुजरातच्या वलसाडमध्ये अतिशय अनोख्या पद्धतीने रक्षाबंधनाचा सोहळा पार पडला. या सोहळ्याचे फोटो आणि त्याची माहिती पाहून अनेकांचे डोळे पाणावले आहेत. शिवम मिस्त्री नावाच्या मुलाने वर्षभरापूर्वी आपल्या बहिणीला गमावलं. बहिणीला गमावलं पण अवयव दानामुळं बहिणीचे हात मात्र अजूनही या जगात आहेत. याच हातानं शिवम मिस्त्रीला राखी बांधण्यात आली. विशेष म्हणजे बहीण-भावाच्या या नात्यानं धर्माची भिंतही गळून पडली.

१६ वर्षांच्या अनमता अहमदने शिवम मिस्त्रीला राखी बांधली. अनमताने ज्या हाताने राखी बांधली, ते हात शिवमची बहीण रियाचे आहेत. नऊ वर्षांच्या रियाचे सप्टेंबर २०२४ मध्ये निधन झाले होते. रियाच्या दुर्दैवी निधनानंतर सूरतच्या एनजीओच्या पुढाकाराने रियाचे हात मुंबईच्या गोरेगावमध्ये राहणाऱ्या अनमताला देण्यात आले.

आज त्याच हातानी शिवमला राखी बांधल्यानंतर मिस्त्री कुटुंबिय आपले अश्रू रोखू शकले नाहीत. शिवमचे वडील बॉबी मिस्त्री म्हणाले, “आम्ही अनमताच्या हातांना स्पर्श केला आणि ती रियाच असल्याचा भास आम्हाला झाला. आमच्या संपूर्ण मिस्त्री कुटुंबात रिया एकमेव मुलगी होती. रिया आजही जिवंत आहे असं आम्हाला वाटतं.”

अनमतानं हात कसे गमावले?

दहावीत असताना २०२२ साली अनमता उच्च दाबाच्या तारेच्या संपर्कात आल्यानंतर तिचा उजवा हात कापून टाकावा लागला होता. तिचा डावा हातही केवळ २० टक्के क्षमतेनं काम करत होता.

दोन वर्षांनी वलसाडमध्ये चौथीत शिकणारी रिया आजारी पडली. अचानक आजारी पडलेल्या रियाला अनेक रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, पण प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर १५ सप्टेंबर रोजी सूरतच्या किरण रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. सीटी स्कॅनमध्ये तिच्या मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळे तिचा मेंदू मृत झाल्याचे कळले. यामुळे रियाच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला.

याच सुमारास डोनेट लाइफ एनजीओनं रियाच्या कुटुंबाशी संपर्क साधला आणि त्यांचे समुपदेशन केले. त्यानंतर त्यांनी अवयव दानाची तयारी दर्शविली. रियाच्या खांद्यापासूनचा हात मुंबईला पाठवण्यात आला. १७ सप्टेंबर २०२४ रोजी त्याचे प्रत्यार्पण करण्यात आले. खांद्यापासून प्रत्यार्पण शस्त्रक्रिया करणारी अनमता जगातील सर्वात लहान वयाची मुलगी ठरली.

डोनेट लाइफ एनजीओचे अध्यक्ष नीलेश मांडलेवाला म्हणाले की, रियाचे मूत्रपिंड आणि यकृतदेखील वेगवेगळ्या लाभार्थ्यांना दान करण्यात आले.