राष्ट्रीय महामार्गावर पोलीस ज्या ट्रकचा पाठलाग करत होते त्या ट्रकचा ऑटो रिक्षासोबत अपघात झाल्याने आठ जण ठार झाले आहेत. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून पोलिसांवर जमावाने दगडफेक केली आहे. बिहारमध्ये मुजफ्फरपूर येथे ट्रक आणि ऑटो रिक्षाच्या अपघातामध्ये आठ जण ठार झाले. तर सहा जण जखमी झाले आहे. अपघातमधील जखमींना वाचवण्यासाठी गेलेल्या चार जणांना सापाने चावल्यामुळे त्यांना देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रुग्णांना एसकेएमसीएच रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्गावर वेगाने धावणाऱ्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ऑटो रिक्षासोबत अपघात झाला. या अपघातानंतर नागरिकांनी पोलीस आणि रुग्णवाहिकांना फोन केले.
Muzaffarpur (Bihar): Collision between a truck and an auto rickshaw in Bhikhanpur. 8 persons dead pic.twitter.com/aFO2b2O8JX
— ANI (@ANI) February 10, 2017
ऑटो रिक्षामध्ये एकूण १४ जण बसलेले होते. जेव्हा हा अपघात झाला त्यानंतर रिक्षातील सर्व प्रवासी दूरवर फेकले गेले. काही जण रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाझुडपांमध्ये फेकले गेले. जेव्हा त्या लोकांना काढण्यासाठी काही नागरिक पुढे आले तेव्हा त्यांना सापाने चावले.
कसा झाला अपघात
एनएच ७७ वर एक ट्रक धावत होता. पोलिसांना त्या ट्रकला थांबण्यास सांगितले. परंतु ट्रक चालकाने पोलिसांचे ऐकले नाही. पोलिसांनी त्या ट्रकचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. ट्रकपाठीमागे पोलीस लागल्यामुळे ट्रक चालकाने आपला ट्रक जोरात पळविण्यास सुरुवात केली. पोलिसांची जीप ट्रकच्या अगदी जवळ आली. आणि त्यांनी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. तितक्यात समोरुन १४ प्रवासी घेऊन एक ऑटो रिक्षा येत होते. बाजूला पोलिसांची गाडी आणि समोरुन ऑटो रिक्षा पाहून चालक गांगरुन गेला. त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे अपघात झाला. या अपघातानंतर जनतेनी एकदम तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. पोलीस आणि जनतेच्या या संघर्षात एनएच ७७ जॅम झाल्याचे वृत्त आहे.
१० जण रुग्णालयात
हा अपघात झाल्यानंतर ऑटोमधील ८ जण जागीच ठार झाले तर इतर सहा जणांना नेण्यासाठी रुग्णवाहिका उशिरा पोहचली. त्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. ऑटोमध्ये आठ जण होते तर त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या चार जणांवर दुःखद प्रसंग ओढवला. त्यांना सापाने चावा घेतल्यामुळे त्यांच्यावरही सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.