बिहार निवडणुकीत एनडीएला २०० हून अधिक जागा मिळाल्या. तर राजद सह काँग्रेस आणि महाआघाडीचं पानिपत झालं. या निकालानंतर दुसऱ्या दिवशीच लालू प्रसाद यादव यांच्या घरात फूट पडली आहे. रोहिणी आचार्य यांना चपलेने मारण्याचा प्रयत्न झाला आणि त्यांची घरातून तसंच पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. यानंतर रोहिणी आचार्य यांनी पोस्ट लिहून घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवला. तसंच माझे आई वडीलही रडत होते. ते माझ्या बरोबर आहेत पण यापुढे तेजस्वीशी काहीही संबंध नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
रोहिणी आचार्य काय म्हणाल्या?
“माझा आवाज बसला आहे. आता काय बोलू? मला जे सांगायचं ते मी सोशल मीडियावर बोलले आहे. रोहिणी कायमच खरं बोलते. कुणाला काय विचारायचं असेल तर विचारा. माझ्यावर चप्पल उगारली गेली ते मी खरं सांगितलं आहे. संजय यादव, तेजस्वी यादव यांना विचारा काय घडलं. शिवाय रमेशला विचारा. माझे वडील आणि माझी आई माझ्या बरोबर आहे. जे काही घडलं त्यामुळे ते दोघंही रडत होते. माझ्या बहिणीही रडत होत्या. देवाचे आभार मानते की मला असे आई वडील मिळाले आहेत ज्यांनी मला कायमच साथ दिली, पाठिंबा दिला. माझं फक्त इतकंच सांगणं आहे की तुमच्या सगळ्यांच्या कुटुंबात माझ्यासारखी बहीण किंवा मुलगी असायला नको. सगळं बलिदान भावांनीच दिलं आहे का? बहिणीने प्रश्न विचारला की सांगतात की तू तुझ्या सासरी निघून जा. तुझं लग्न झालं आहे हे सांगत आहेत. माझे आई वडील, माझ्या बहिणी माझ्या बरोबर आहेत. तेजस्वीशी माझा काही संबंध नाही. मी आता माझ्या सासूकडे चालली आहे. माझ्या सासूलाही हा तमाशा पाहून रडू आलं.” असंही रोहिणी आचार्य यांनी म्हटलं आहे.
रोहिणी आचार्य पाटणा विमानतळावर काय म्हणाल्या होत्या?
“माझं आता कुठलंही कुटुंब नाही. तुम्ही मला प्रश्न विचारु नका. तेजस्वी यादव, संजय यादव आणि रमीज यांना प्रश्न विचारा. माझं आता कुटुंब नाही. मला या तिघांनी कुटुंबातून हाकललं आहे. कारण या तिघांनाही जबाबदारी घ्यायची नाही. सगळं जग म्हणतं आहे जो चाणक्य असेल त्याला तुम्ही प्रश्न विचारणार का? कार्यकर्ता चाणक्याला प्रश्न विचारतो आहे. सगळा देश चाणक्याला प्रश्न विचारतो आहे की पक्षाची अशी अवस्था का झाली? संजय, तेजस्वी आणि रमीझ यांचं नाव घेतलं तर तु्म्हाला घरातून हाकललं जाईल, बदनाम केलं जाईल, तुम्हाला चपलेने मारलं जाईल.” अशी संतप्त प्रतिक्रिया रोहिणी आचार्य यांनी पाटणा विमानतळावर दिली. दरम्यान भाजपाचे नेते निशिकांत दुबे यांनी दोन पोस्ट केल्या आहेत आणि खोचक प्रतिक्रिया दिली आहे
