दिल्लीत असलेल्या एम्स रुग्णालयात पलव सिंग नावाचा मुलगा त्याच्या वडिलांना घेऊन आला. त्याचे वडील मृत्यूशी झुंज देत आहेत. त्याविषयी त्याने एक पोस्ट लिहिली आहे. एका मध्यमवर्गीय घरात जेव्हा अशा प्रकारे वेळ येते तेव्हा काय घडतं ते या मुलाने सांगितलं आहे. त्याची ही पोस्ट वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.
नेमकी काय आहे ही घटना?
१५ सप्टेंबर २०२३ या दिवशी पलवच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. ज्यानंतर गोरखपूरच्या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. त्यावेळी त्यांच्या हृदयात ब्लॉकेजेस असल्याचं कळलं. तसंच त्यांच्या हृदयाचं कार्य २० टक्केच सुरु असल्याचंही समोर आलं. पलवला हे सांगण्यात आलं की वडिलांना घेऊन आणखी चांगल्या रुग्णालयात गेलं पाहिजे.
अडथळ्यांची शर्यत
या दरम्यान आलेल्या आर्थिक अडथळ्यांची शर्यत पार करत पलवने नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात वडिलांना दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणलं. मात्र इथे असलेल्या लांबच लांब रांगा आणि न संपणारा वेटिंग पिरियड या मुळे हे कुटुंब जास्त त्रासलं आहे. पलवची बहीण कार्डिओलॉजिस्टची वेळ मिळावी म्हणून २४ तास रांगेत उभी होती.
पलवने दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयातली संपूर्ण प्रक्रिया ही न संपणारी वाट पाहायला लावणारी होती. तसंच रुग्णालयाबाहेर चाचण्या झाल्या होत्या तरीही टू डी इको टेस्ट करण्यासाठी त्याला एक आठवडा बघावी लागत होती. पलवच्या पोस्टनुसार डॉक्टरांचा काही मिनिटांचा वेळ मिळण्यासाठी त्याला तास अन् तास रांगेत उभं रहावं लागलं. पद्म पुरस्कार विजेत्या एका डॉक्टरांनी त्याला औषधोपचार लिहून दिले. पण फॉलोअप साठी तारीख न देताच यायला सांगितलं.
१५ दिवस प्रतीक्षा केल्यानंतर डॉक्टरांनी वडिलांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करावी लागेल असं सांगितलं. वडिलांचे हृदय २० टक्के कार्य करत असताना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला कसा काय दिला गेला? हा प्रश्न पलवला पडला आहे. तसंच या शस्त्रक्रियेची शिफारस आधी का केली नाही? त्यासाठी इतकी वाट का बघावी लागली? हे प्रश्नही त्याच्याजवळ आहेत.
पलवने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की आम्ही मध्यमवर्गीय कुटुंबातले आहोत. रुग्णालयात खर्च करण्यासाठी आम्हाला आर्थिक चणचण भासू लागली आहे. तसंच माझ्या वडिलांची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. माझ्या वडिलांना मधुमेह आहे, त्यांचं हृदय २० टक्केच कार्यरत आहे अशात त्यांना शस्त्रक्रियेसाठी १३ महिने वाट बघावी लागणार आहे जे जवळपास अशक्य आहे असं पलवने म्हटलं आहे. तसंच माझ्या वडिलांचा लवकरच मृत्यू होईल असंही भावनिक वाक्य त्याने लिहिलं आहे.
आपल्या एक्स अकाऊंटवर पलवने थोडक्यात त्याच्या घरातली परिस्थिती मांडली आहे. त्याची आई देखील आजारी आहे. त्याच्या आईवरही एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वाढती बिलं आणि आर्थिक चणचण यामुळे आमचं कुटुंब डबघाईला येण्याच्या उंबरठ्यावर उभं आहे असंही या मुलाने पोस्टमध्ये म्हटलं आहे.