Gujarat Gambhira Bridge Collapse: गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यातील गंभीरा पूल कोसळून ११ जणांचा मृत्यू (सायंकाळी ७.३० पर्यंतची माहिती) झाल्याचे समोर आले आहे. बुधवारी सकाळी घडलेल्या अपघातातील एक हृदयद्रावक व्हिडीओ आता समोर आला आहे. ४६ वर्षीय सोनलबेन पडियार या दुर्घटनेतून बचावल्या. त्या दोन अल्पवयीन नातवंडांसह कुटुंबातील आठ सदस्यांसह इको कारमधून प्रवास करत होत्या. आता त्यांचा कमरेइतक्या पाण्यातला व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात त्या बुडत्या गाडीजवळ उभ्या राहून मदतीसाठी ओरडत आहेत. “माझा मुलगा बुडाला, माझे कुटुंबिय बुडाले…”, असे जीवाच्या आकांताने त्या ओरडत असल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे.
सदर अपघातात सोनलबेन वगळता गाडीतील सर्व प्रवासी ज्यात त्यांचा पती, मुलगा, मुलगी आणि जावई, दोन नातवंडे यांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तविली जात आहे. गंभीरा पूल कोसळला तेव्हा एकूण पाच वाहने, दोन ट्रक, दोन कार आणि एक रिक्षा नदीत पडल्याचे सांगण्यात येत आहे. एक ट्रक अजूनही धोकादायक स्थितीत पुलावर लटकला आहे.
वडोदरा येथील एसएसजी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सोनलबेन यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला तेव्हा त्यांनी अपघाताचा घटनाक्रम सांगितला. त्या म्हणाल्या, गुरुपौर्णिमा येत असल्यामुळे आम्ही सर्व कुटुंबिय देवदर्शनाला जात होतो. बुधवारी सकाळी ७ वाजता दरियापुराहून बगदाणा (सौराष्ट्र) येथे निघालो होतो. जेव्हा पूल अचानक कोसळला तेव्हा आमच्या बाजूला एक ट्रक आणि काही मोटारसायकलही होत्या. काही कळायच्या आतच आमचे वाहन पाण्यात पडले.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओबाबत विचारले असता सोनलबेन म्हणाल्या, मी पाण्यात उभी राहून माझ्या कुटुंबियांना वाचविण्यासाठी आर्जव करत होते. मी गाडीच्या मागच्या बाजूला बसली असल्यामुळे मी एकटीच गाडीतून बाहेर पडण्यात यशस्वी ठरले. गाडी पाण्यात उपडी पडल्यामुळे त्यांना कुणालाच पाण्याच्या बाहेर पडता आले नाही.
Gambhira Bridge collapse: Video shows woman’s heart-wrenching cries for help from Mahisagar Riverhttps://t.co/Q1HfyvkpFx pic.twitter.com/AtTm3EkEza
— DeshGujarat (@DeshGujarat) July 9, 2025
सोनलबेन पुढे म्हणाल्या, “अपघात झाल्यानंतर एका तासाने तिथे मदत आली. तोपर्यंत कुणीही माझ्या मदतीसाठी आले नाही. माझे कुटुंब तेवढा वेळ पाण्याखाली होते. मला माहीत होते की, मी त्यांना गमावले आहे. महिसागरमध्ये कार कोसळल्यानंतर कोण वाचेल? त्या गाडीत माझा दोन वर्षांचा नातूही होता. पोलीस आणि बचाव पथके बोट घेऊन आल्यानंतर मी बाहेर पडले. माझे कुटुंबिय कुठे आहेत, याची कल्पना नाही.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातानंतर दुःख व्यक्त केले. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींसाठी ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले. गुजरातचे मुख्यमंत्री यांनीही मृतांच्या वारशांना ४ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली.