बँकॉक : म्यानमारमध्ये गेल्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत गैरव्यवहार केल्याप्रकरणी तेथील पदच्युत नेत्या आंग सॅन सू ची आणि अन्य १५ राजकीय नेत्यांविरोधात खटला चालविला जाईल, अशी घोषणा म्यानमारच्या निवडणूक आयोगाने केली आहे. सरकारी मालकीच्या ग्लोबल न्यू लाइट ऑफ म्यानमार आणि अन्य अधिकृत माध्यमांतून मंगळवारी हे जाहीर करण्यात आले. स्यू ची यांचे सरकार उलथवून लष्कराने १ फेब्रुवारीला सत्ता ताब्यात घेतली. त्यावेळी लष्कराने सार्वत्रिक निवडणुकीतील गैरव्यवहाराचे कारण पुढे केले होते. सू ची यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी या पक्षाने पाच वर्षांचा कार्यकाल आधी पूर्ण केला होता. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत याच पक्षाला पुढील पाच वर्षांसाठी जनादेश मिळाला होता. या निवडणुकीत लष्कराने पाठिंबा दिलेल्या युनियन सॉलिडरिटी अ‍ॅन्ड डेव्हलपमेंट पार्टीचा मोठा पराभव झाला होता. एशियन नेटवर्क फॉर फ्री इलेक्शनसारख्या स्वतंत्र निरीक्षकांना निवडणुकीत मोठा गैरप्रकार झाल्याचा कोणताही पुरावा मिळाला नव्हता, पण त्यांनी काही बाबींवर टीका केली होती.