नवी दिल्ली : निवडणूक आयोग प्रभावाखाली येऊन मृतांना, कायमचे स्थलांतरित झालेल्यांना किंवा अनेक ठिकाणी मतदार म्हणून नोंदणी केलेल्यांना मतदार यादीत स्थान देणार नाही, असे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी गुरुवारी सांगितले. बिहारमध्ये मतदार यादीच्या विशेष सखोल तपासणीवरून (एसआयआर) निवडणूक अधिकाऱ्यांवर विरोधी पक्षांच्या वाढत्या टीकेवर आयुक्त कुमार यांनी स्पष्टीकरण दिले.
बिहारमध्ये अनेक मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. त्यावर आयुक्त कुमार म्हणाले की, अपात्र व्यक्तींना प्रथम बिहारमध्ये आणि नंतर पूर्ण देशात मतदान करण्याची परवानगी देणे हे संविधानाच्या विरोधात आहे. या प्रश्नावर आपण सर्वांनी राजकारणापलीकडे जाऊन खोलवर विचार करणे आवश्यक आहे. बिहारमध्ये मतदार यादीच्या सध्या सुरू असलेल्या विशेष सखोल तपासणीअंतर्गत घरोघरी भेटी दिल्या जात आहेत. यामध्ये ५२ लाखांहून अधिक मतदार त्यांच्या पत्त्यावर उपस्थित नव्हते, तसेच १८ लाख मतदारांचा मृत्यू झाल्याचे आढळले, असे आयुक्तांनी सांगितले.
फसवणुकीचे १०० टक्के पुरावे : राहुल गांधी
कर्नाटकातील एका मतदारसंघा त निवडणूक आयोगाने फसवणूक करण्यास परवानगी दिल्याचे १०० टक्के ठोस पुरावे आहेत. निवडणूक निरीक्षकांना असे वाटत असेल की ते यातून सुटतील, परंतु आम्ही तसे होऊ देणार नाही, असा इशारा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी दिला. निवडणूक आयोग भारताच्या निवडणूक आयोगाप्रमाणे काम करीत नाही, असा आरोपही त्यांनी केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी बिहारमधील लाखो मतदारांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचा डाव असल्याचा आरोप करत संसद भवनात विरोधी पक्षांनी गुरुवारी निदर्शने केली.