scorecardresearch

“जनतेचे प्रश्नच सोडवणार नसले तर ते सरकार…”; नाना पटोलेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल; धार्मिक मुद्द्यांवरुनही साधला निशाणा

देशाच्या तिजोरात सर्वात जास्त पैसा मुंबई, महाराष्ट्रातून जातो पण केंद्र सरकार महाराष्ट्राला निधी देताना मात्र हात आखडता घेते, असंही पटोले म्हणालेत.

Nana Patole narendra modi
नाना पटोले व नरेंद्र मोदी (फाइल फोटो)

देशातील सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. रुपयाची दररोज घसरण होत आहे, महागाई व बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. जनतेच्या जीवन मरणाचे प्रश्न असताना धार्मिक मुद्द्यांना पुढे करून वातावरण बिघडवायचे व मुख्य प्रश्नांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचे एक मोठे षडयंत्र भाजपाकडून सुरु आहे परंतु काँग्रेस जनतेच्या हितासाठी केंद्र सरकारला जाब विचारत राहील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकार हे सर्व आघाड्यांवर कुचकामी ठरले असल्याची टीका केलीय. महागाई, शेतकरी, कामगार, गरिबांचे केंद्र सरकार प्रश्न मोदी सरकार सोडवू शकले नाही. काँग्रेस पक्षाला आजच्या परिस्थितीची चिंता वाटते म्हणून जनतेला न्याय कसा मिळेल यासाठी आमची लढाई सुरु आहे, असंही नाना पटोले म्हणाले.

केंद्र सरकारने जनतेला दिलासा देण्याचे निर्णय घेतले पाहिजेत मात्र त्याकडे दुर्लक्ष करून धार्मिक मुद्दे पुढे केले जात आहेत. हिंदू धर्माबद्दल आम्हाला दुसऱ्यांकडून शिकण्याची गरज नाही, माणुसकी हा खरा धर्म असून ती जोपासली पाहिजे, असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे. जनतेचे प्रश्नच सोडवणार नसले तर ते सरकार काय कामाचे? काँग्रेस पक्षाने सातत्याने जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर संघर्ष केला आहे. आजही आम्ही जनतेच्या प्रश्नासाठी केंद्र सरकारविरोधात उभे आहोत, असंही नाना पटोलेंनी म्हटलंय.

महागाईप्रश्नी विरोधी पक्ष राज्य सरकारकडे बोट करत आहेत हे साफ चुकीचे आहे, याप्रश्नी विरोधकांचे आरोप बिनबुडाचे आहेत. महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षात कोणतीही करवाढ केलेली नाही, असं नाना पटोलेंनी म्हटलंय. जीएसटीमुळे राज्याच्या हातात काही राहिलेले नाही आणि केंद्र सरकारने महाराष्ट्राचे करोडो रुपये थकवलेले आहेत, असा दावाही नाना पटोलेंनी केलाय.

देशाच्या तिजोरात सर्वात जास्त पैसा मुंबई, महाराष्ट्रातून जातो पण केंद्र सरकार महाराष्ट्राला निधी देताना मात्र हात आखडता घेते, हा महाराष्ट्रावर अन्याय आहे. केंद्र सरकारनेच इंधनावरील करातून २६ लाख कोटी रुपये कमावले आहेत आणि राज्य सरकारने कर कमी करावेत अशी अपेक्षा केंद्र सरकार व भाजपा करत आहे हे अत्यंत चुकीचे आहे, असेही प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nana patole slams modi government says religious issues are use to divert attention from main issues scsg

ताज्या बातम्या