गुंतवणूकदार मेळाव्यात घोषणा
उत्तर प्रदेशातील विकासापासून वंचित राहिलेल्या बुंदेलखंड भागात संरक्षण उद्योग मार्गिका सुरू करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली. येथील गुंतवणूकदारांच्या शिखर परिषदेत ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, अर्थसंकल्पात आम्ही संरक्षण उद्योगांच्या दोन मार्गिकांची घोषणा केली आहे. त्यातील एक बुंदेलखंड भागात सुरू करण्यात येईल. त्यात वीस हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून अडीच लाख लोकांना रोजगार मिळेल.
उत्तर प्रदेशची क्षमता खूप मोठी असल्याचे सांगून ते म्हणाले की, कुठल्याही भागाचा विकास करण्यासाठी धोरणात्मक निर्णय व त्यानुसार कामगिरी आवश्यक असते. मुख्यमंत्री आदित्यनाथ व येथील जनता या दोन कसोटय़ांवर खरे उतरतील याचा विश्वस वाटतो.
योगी आदित्यनाथ सरकारने उत्तर प्रदेशातील नकारात्मक वातावरण दूर करून नवा उत्साह आणला आहे असे सांगून ते म्हणाले की, ही गुंतवणूकदार परिषद लखनौत होत आहे ही महत्त्वाची बाब आहे. आताच्या सकारात्मक बदलांनी लोकांना आशेचे किरण दिसू लागले आहेत. उत्तर प्रदेश हा मूल्यांवर आधारित प्रांत आहे, पण त्यात मूल्यवर्धनाची गरज आहे म्हणजे आणखी काही गोष्टींची भर टाकण्याची आवश्यकता आहे. एक जिल्हा एक उत्पादन हे धोरण योगी आदित्यनाथ सरकारने सुरू केले आहे त्यामुळे राज्याचा कायापालट घडून येईल. उत्तर प्रदेशातील जेवर व कुशीनगर भागात आंतरराष्ट्रीय विमानतळे उभारण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली.