पीटीआय, नवी दिल्ली
‘‘व्यापक, सखोल आणि उच्च दर्जा ही भारताची ओळख असून, जागतिक स्तरावर मोठी भूमिका निभावण्याची त्याची क्षमता आहे,’’ असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्यक्त केले. अमेरिकेच्या ऐतिहासिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे दैनिक ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अमेरिकेचे आणि भारताचे संबंध पूर्वीपेक्षा अधिक दृढ असल्याचा विश्वास व्यक्त केला.
सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर राखणे, कायदेशीर नियम पाळणे आणि मतभेद आणि विवादांच्या शांततापूर्ण निराकरणावर आमचा दृढ विश्वास आहे. तसेच भारत आपले सार्वभौमत्व आणि प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी सदैव सज्ज आणि वचनबद्ध आहे. मात्र, भारत विस्तारवादी नसल्याने कोणत्याही देशावर आक्रमण करत नाही. जगात आपल्याला योग्य स्थान मिळावे यासाठी भारत आग्रही आहे, असे मुद्दे त्यांनी मांडले.‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या मतानुसार भारताने शिक्षण आणि पायाभूत सुविधांमध्ये मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. सध्याच्या भू-राजकीय तणावाच्या काळात बहुराष्ट्रीय कंपन्या उत्पादन आणि जागतिक पुरवठा साखळय़ांत विविधता आणू पाहत आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी भारत सज्ज आहे. या संदर्भात मोदींनी आपली मते व्यक्त केली.
मोदी म्हणाले की, अमेरिका आणि भारतादरम्यानचे संबंध कधी नव्हे एवढे दृढ झाले आहेत. उभय देशांमध्ये विश्वासाचे वातावरण आहे. युक्रेन संघर्षांवर ते म्हणाले की, आम्ही तटस्थ नसून, आम्ही शांततेच्या बाजूने आहोत. वाद युद्धाने नव्हे तर मुत्सद्दीपणाने आणि संवादाने सोडवावा. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी आपण या संघर्षांबाबत अनेकदा बोललो असल्याचेही मोदींनी सांगितले.सीमा भागात शांतता आणि स्थैर्य आवश्यक ‘चीनबरोबर असलेल्या सीमा भागात शांतता आणि स्थैर्य राखणे आवश्यक आहे. तरच चीनशी सामान्य द्विपक्षीय संबंध राहू शकतील,’ असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, भारत आपले सार्वभौमत्व व प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहे. सार्वभौमत्व व प्रादेशिक अखंडतेचा आदर करणे, कायद्याचे पालन करणे आणि मतभेदांचे शांततेने निराकरण करणे यावर भारताचा दृढ विश्वास आहे.
महत्त्वाच्या जागतिक संस्थांमध्ये खरोखरच लोकशाही मूल्यांनुसार प्रत्येक राष्ट्राला प्रतिनिधित्व आहे का? लोकसंख्या, अर्थव्यवस्था हे घटक पाहता, या संघटनेत भारताला योग्य प्रतिनिधित्व मिळत आहे का, याचा विचार जगाने करावा. -नरेंद्र मोदी, पंतप्रधान