नवी दिल्ली : कर्नाटकमधील प्रचाराची सुरुवात होण्याआधी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या मोफत वाटप संस्कृतीवर तीव्र हल्लाबोल केला. पुढील २५ वर्षांच्या विकासाचा आराखडा घेऊन काम करणारा भाजप हा देशातील एकमेव पक्ष आहे. बाकी पक्ष रेवडी वाटून मतदारांना चुचकारण्याचे काम करत आहेत. काँग्रेस हा कालबाह्य झाला असून त्यांनी दिलेल्या हमीलाही अर्थ उरलेला नाही, अशी कडवी टीका मोदींनी केली.
काँग्रेसने आता ‘आप’प्रमाणे २०० युनिट वीज मोफत, दहा किलो तांदूळ मोफत अशा अनेक लोकप्रिय घोषणा केल्या असून मोदींनी या रेवडी संस्कृतीवर पुन्हा टीका केली. ही फुकट वाटपाची संस्कृती विकासआड येत असून राज्ये कर्जात बुडू लागली आहेत. खैरात वाटून देश व सरकार चालवता येत नाही. करोनासारख्या महासंकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी तात्पुरता पर्याय म्हणून गरिबांना मोफत धान्य दिले गेले, मोफत लसीकरणही केले गेले. पण, प्रगती करायची असेल तर फुकट वाटप संस्कृतीपासून देशाला मुक्त केले पाहिजे, असे मोदी म्हणाले.

कर्नाटकमधील बूथस्तरावरील लाखो भाजप कार्यकर्त्यांशी दूरचित्रसंवादाद्वारे थेट संपर्क साधत मोदींनी राज्यातील तमाम कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्याचा प्रयत्न केला. विविध निवडणूक अंदाज तसेच, पक्षातील बंडखोरीनंतर भाजपसाठी कर्नाटकमधील विधानसभा निवडणूक सोपी राहिलेली नसल्याचे मानले जात आहे. मात्र, मोदी हाच विजयाचा एकमेव चेहरा असल्याचे भाजपचे म्हणणे असून मोदींच्या कर्नाटक दौऱ्यापूर्वी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी मोदींचे भाषण आयोजित केले होते. सुमारे ६० हजार बूथवरील ५० लाखांहून अधिक कार्यकर्ते मोदींच्या आभासी सभेत सहभागी झाल्याचे सांगितले जाते.

‘मतदार भाजपचे ४० टक्के कमिशन सरकार संपवणार!’

‘काँग्रेस पक्ष विकासाची हमी देऊ शकत नाही,’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानावर काँग्रेसने जोरदार प्रहार केला. ‘‘कर्नाटकातील जनता भाजपचे ‘४० टक्के कमिशन सरकार’ संपवण्याची हमी देईल. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले, ‘‘अमित शहा आणि योगी यांच्यानंतर आता नैराश्यामुळे संतापजनक टिप्पणी करण्याची पाळी मोदींची आहे. काही दिवसांनंतर काँग्रेसच्या विकासाच्या हमींची अंमलबजावणी केली जाईल. राजस्थान, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशात ज्या प्रकारे विकासाच्या हमींची अंमलबजावणी केली, तसाच विकास कर्नाटकात केला जाईल,’’ असे रमेश म्हणाले.

मोदींच्या विनोदावर काँग्रेसची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका खासगी वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना बुधवारी आत्महत्येवरून विनोद केला होता. त्यावर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांनी टीका केली. मानसिक आरोग्यासारख्या संवेदनशील विषयावर विनोद करणारे आणि त्यावर खिदळणाऱ्यांनी स्वत:ला शहाणे करण्याची गरज आहे, अशा शब्दांत वढेरा यांनी तोफ डागली. तर हजारो कुटुंबे मुलांच्या आत्महत्येमुळे व्यथित असताना पंतप्रधानांनी त्यावर विनोद करायला नको होता, असे ट्वीट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले.