पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जुलैमध्ये इस्रायल दौऱ्यावर जाणार आहेत. इस्रायलला भेट देणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरतील. इस्राइल दौऱ्याआधीच दोन्ही देशांमधील परस्पर संबंधांना बळकटी मिळण्यास सुरुवात झाली आहे. दोन्ही देशांमध्ये संरक्षण विषयक सहकार्य वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. इस्रायलकडून भारत तब्बल ८,००० क्षेपणास्त्रे खरेदी करणार आहे. आपल्या शस्त्रास्त्रांची सर्वात मोठी निर्यात इस्रायल भारतामध्येच करतो. त्यामुळे दोन्ही देशांच्या दृष्टीने हे संबंध अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. भारत इस्रायलकडून अॅंटी टॅंक मिसाइल आणि बराक-८ एअर मिसाइल्स विकत घेणार आहे.

या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर पुढील दोन वर्षांमध्ये एकूण २००० क्षेपणास्त्रे भारतात दाखल होणार आहेत. हा गेल्या काही वर्षातील सर्वात मोठा करार ठरण्याची शक्यता आहे. भारत एकूण २ अब्ज डॉलरची खरेदी करणार आहे. भारतीय सेनेला अत्याधुनिक करण्याची पंतप्रधानांची योजना आहे. २०२५ पर्यंत २५० अब्ज डॉलरची संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक केली जाणार आहे. २०१४ ला पंतप्रधान मोदींनी जेव्हापासून आपला पदभार सांभाळला आहे तेव्हापासून त्यांनी इस्रायलसोबत संबंध बळकट करण्यावर भर दिला आहे. आयातीबरोबरच भारतामध्ये देखील क्षेपणास्त्र आणि शस्त्रास्त्रे बनवण्याच्या कामावर भर दिला जात आहे. भेल, भारत डायनामिक्स लिमिटेड या कंपन्या भारतीय बनावटीची शस्त्रास्त्रे तयार करण्यासाठी डीआरडीओला सहकार्य करत आहेत. आतापर्यंत भारत आणि इस्रायलमध्ये साडे सहा हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे व्यवहार झाले आहेत.