बॉम्बपेक्षा विकास शक्तिशाली!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काश्मीरमध्ये द्वेष पसरवण्याचा आणि तेथील विकासकामात अडथळे आणण्याचे प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाहीत. बंदुकीच्या गोळ्या आणि बॉम्बपेक्षा विकास शक्तिशाली असतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.

पंतप्रधान मोदी ‘मन की बात’ या नभोवाणी कार्यक्रमात बोलत होते. जम्मू-काश्मीरमध्ये जूनमध्ये घेतलेल्या ‘पुन्हा खेडय़ाकडे चला’ या उपक्रमाला सर्वत्र अगदी अतिसंवेदनशील आणि दुर्गम भागातील नागरिकांचा उत्साही प्रतिसाद मिळाला. सरकारी अधिकाऱ्यांनी नागरिकांपर्यंत जाऊन या विकास योजनेची माहिती दिली, असेही मोदी म्हणाले.

मुख्य धारेतील विकासकार्यात सहभागी होण्यास काश्मीरमधील नागरिक किती उत्सुक आहेत, हेच या कार्यक्रमातून दिसले. हा कार्यक्रम आणि त्यातील लोकांच्या सहभागानेच काश्मीरमधील नागरिकांना सुशासन हवे असल्याचे दाखवून दिले आहे, असे मोदी यांनी सांगितले. बंदुकीच्या गोळ्या आणि बॉम्बपेक्षा विकासच शक्तिशाली असतो, हेही या कार्यक्रमातून सिद्ध झाले आहे, अशी टिप्पणीही मोदी यांनी केली.  प्रथमच वरिष्ठ सरकारी अधिकारी ४५०० खेडय़ांमधील काश्मिरी नागरिकांच्या घरापर्यंत गेले. सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबारामुळे दहशतीखाली असलेल्या सीमेवरील खेडय़ांमधील नागरिकांपर्यंतही अधिकारी पोहोचले. इतकेच नव्हे तर अतिरेक्यांच्या दहशतीखाली असलेल्या पुलवामा, शोपियन, कुलगाम आणि अनंतनाग जिल्ह्य़ातील अतिसंवेदनशील भागातील नागरिकांनाही सरकारी अधिकारी निर्भयपणे भेटले. त्यामुळे विद्वेष पसरवून विकासात अडथळे आणणाऱ्या लोकांचे मनुसबे कधीच यशस्वी होणार नाहीत, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले.

काश्मिरी आदरातिथ्याचे कौतुक

१ जुलैपासून आतापर्यंत तीन लाख भाविकांनी अमरनाथ यात्रा केली. ही संख्या २०१५मधील ६० दिवसांतील यात्रेकरूंपेक्षा अधिक आहे, असेही मोदी म्हणाले. काश्मीरमधील नागरिकांच्या आदरातिथ्याचे कौतुक करून ही गोष्ट पर्यटनाला चालना देणारी आहे, अशी भावनाही पंतप्रधानांनी व्यक्त केली.

स्वातंत्र्य दिनात लोकसहभाग वाढवा 

स्वातंत्र्य दिन खास तयारीनिशी साजरा करा आणि त्यात मोठय़ा प्रमाणावर लोकांनी सहभागी व्हावे, यासाठी नवे मार्ग शोधा. १५ ऑगस्ट पारंपरिक सण आणि लोक उत्सव म्हणून कसा साजरा करता येईल यावर विचार करा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

मेघालय, हरयाणाचे कौतुक

जलसंवर्धनाच्या प्रश्नावरही पंतप्रधानांनी भाष्य केले. या प्रश्नावर मेघालय सरकार पाणी धोरण तयार करत असल्याबद्दल पंतप्रधानांनी कौतुक केले. त्याचबरोबर हरयाणा सरकार कमी पाण्यावर होणाऱ्या पिकांची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत असल्याबद्दलही मोदी यांनी गौरवोद्गार काढले.

बंदुकीच्या गोळ्या आणि बॉम्बपेक्षा विकासात अधिक शक्ती असते. विकासात अडथळे आणण्याचे मनसुबे नेस्तनाबूत होतील.    – नरेंद्र मोदी, पंतप्रधान.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi kashmir conflict mpg
First published on: 29-07-2019 at 01:05 IST