नरेंद्र मोदींनी कधीही चहा विकला नाही ते फक्त प्रसारमाध्यमांच्या प्रचारामुळे पंतप्रधान झाले अशी खोचक टीका भाजपाचे खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी केली आहे. सोमवारी काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्या ‘दी पॅराडॉक्सिकल प्राइम मिनिस्टर, नरेंद्र मोदी अँड हिज इंडिया’ या पुस्तकाचे प्रकाशन तिरुवनंतपुरम या ठिकाणी करण्यात आले. या कार्यक्रमाला शत्रुघ्न सिन्हांचीही हजेरी होती. त्याच कार्यक्रमात त्यांनी ही टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शत्रुघ्न सिन्हा म्हटले की मला अनेक लोक विचारतात तुम्ही कलाकार आहात, तुम्हाला नोटाबंदी आणि जीएसटीमधलं काय कळतं? जर वकील अनुभव नसताना आर्थिक मुद्द्यांवर बोलतो, टीव्हीवरची कलाकार केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री होते, एक चहा विकणारा माणूस… अर्थात मोदींनी कधीही चहा विकलाच नाही. मोदी फक्त मीडियाच्या जोरावर आणि प्रचारावर पंतप्रधान झाले. ते जर काहीही बोलू शकतात तर मी नोटाबंदी किंवा जीएसटी या मुद्द्यांवर का बोलू शकत नाही? असाही प्रश्न सिन्हा यांनी उपस्थित केला.

माझे नरेंद्र मोदींशी व्यक्तीगत शत्रुत्त्व नाही. मात्र वन मॅन शो आणि टू मॅन आर्मीला मी कंटाळलो आहे असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. कोणत्याही लोकशाही देशात एखादा पक्ष एखाद्या माणसामुळे मोठा होतो. मात्र देश हा पक्षापेक्षा मोठा असतो हे मोदींनी विसरू नये. मी जे म्हणतो आहे त्यावर मी ठाम आहे, मी राष्ट्रहिताबाबत बोलतो असेही सिन्हा यांनी म्हटले आहे.

याच कार्यक्रमात शशी थरुर यांनी शत्रुघ्न सिन्हा यांना काँग्रेसमध्ये येण्याचे निमंत्रणच दिले. तुमचा सारखा नायक आम्हाला हवा आहे असे थरुर म्हटले. तसेच थरुर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तम वक्ते आहेत. मात्र जेव्हा देशात एखाद्या दलित किंवा मुस्लिम व्यक्तीवर हल्ला होतो किंवा त्याला ठार केले जाते तेव्हा मात्र मोदी मूग गिळून गप्प बसतात अशी टीका थरुर यांनी केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi never sold tea says shatrughn sinha
First published on: 25-12-2018 at 04:39 IST