Narendra Modi Speech in Bihar for Assembly Election 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. भारतीय जनता पार्टीने आज बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये प्रचारसभेचं आयोजन केलं होतं. या प्रचारसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील हजर होते. यावेळी त्यांनी मुझफ्फरपूरमधून देशातील दोन नेत्यांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, “देशातील दोन मोठ्या प्रस्थापित व भ्रष्ट कुटुंबांमधील युवराज सतत मला शिव्या देत असतात. गरिब घरातून व मागासवर्गीय समाजातून पुढे आलेला व्यक्ती त्यांना बघवत नाही.”
मोदी यांनी त्यांच्या भाषणात कोणाचंही नाव घेतलं नाही. मात्र, त्यांनी देशातील प्रस्थापित व बिहारमधील प्रस्थापित कुटुंब असा उल्लेख केला. त्यामुळे त्यांचा रोख हा लोकसभेचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख नेते तेजस्वी यादव यांच्याकडे होता असं बोललं जात आहे.
हजारो कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी जामिनावर बाहेर आलेले युवराज, मोदींची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात दोन युवकांची जोडी तयार झाली आहे. हे दोघे स्वतःला युवराज (राजपुत्र) मानतात. या दोन्ही युवराजांनी खोटी आश्वासनं देण्याची दुकानं उघडली आहेत. यापैकी एक देशातील सर्वात मोठ्या, प्रस्थापित राजकारणी कुटुंबाचा युवराज आहे, तर दुसरा बिहारमधील सर्वात मोठ्या, प्रस्थापित राजकारणी कुटुंबाचा युवराज आहे. या दोघांनी हजारो कोटी रुपयांचे घोटाळे केले आहेत. मात्र, सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. आपल्या गावाकडे अशा लोकांना किंमत नसते. जामिनावर घरी आलेल्या व्यक्तीला सन्मान दिला जात नाही.”
दोन्ही युवराज २४ तास मला शिव्या देत असतात : मोदी
“या दोन युवराजांनी मोदीला खूप शिव्या दिल्या आहेत. ही नामदार माणसं आहेत. आता हे नामदार लोक माझ्यासारख्या कामदाराला शिव्या देणारच. कामदाराला शिव्या दिल्याशिवाय यांचं खाल्लेलं अन्न पचत नाही. दलितांना, मागासवर्गीयांना शिव्या देणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे असं हे युवराज समजतात. त्यामुळे ते लोक मला २४ तास शिव्या देत असतात. माझा व माझ्यासारख्या लोकांचा तिरस्कार करतात. मला शिव्या दिल्याशिवाय यांना स्वस्थ बसता येत नाही.”
“चहा विकणारा इथवर पोहोचलाय ते युवराजांना सहन होत नाही”
पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे लोक माझा द्वेष करतात आणि मला घाणेरड्या शिव्या देतात. कारण माझ्यासारखा माणूस इथे बसलेला त्यांना सहन होत नाही. मागासवर्गातून पुढे आलेला, गरिब कुटुंबातून इथवर आलेला, एके काळी चहा विकणारा माणूस इथे पोहोचला आहे ते या लोकांना सहन होत नाही, बघवत नाही.”
