‘फोडा आणि राज्य करा’ हे काँग्रेसचे धोरण

‘‘हिंदू आणि मुस्लीम यांच्यात तणाव निर्माण करून ‘फोडा आणि राज्य करा!’ हे धोरण काँग्रेस अवलंबत आहे,’’ अशी जळजळीत टीका भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली.

‘‘हिंदू आणि मुस्लीम यांच्यात तणाव निर्माण करून ‘फोडा आणि राज्य करा!’ हे धोरण काँग्रेस अवलंबत आहे,’’ अशी जळजळीत टीका भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली.
राजस्थानमधील सवाई माधोपूर, अलवार, बंदिकुरी या ठिकाणी मोदी यांच्या प्रचारसभा झाल्या. या सभांमध्ये त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. ‘‘काँग्रेस हा फुटिरतावादी मानसिकतेचा पक्ष आहे. दोन व्यक्तींना एकमेकांपासून वेगळे करणे आणि त्यांच्यात वाद निर्माण करणे हेच त्यांचे प्रमुख काम आहे. फुटिरतेची भिंत निर्माण करण्याशिवाय कोणतेही काम त्यांच्या हातात नाही,’’ अशी टीका मोदी यांनी केली.
काँग्रेसला त्यांचे चारित्र्य, संस्कृती, परंपरा आणि विचारधारा काय आहे, याची ओळख करून देण्याची गरज आहे. लोक जोडण्याचा ते विचारच करू शकत नाहीत, त्यांना केवळ तोडण्याचेच माहीत आहे. तेच आता त्यांचे राजकीय तंत्र बनले आहे, असे मोदी यांनी सांगितले.
काँग्रेसने देशात उत्तर आणि दक्षिण असा वाद निर्माण केला. त्यानंतर हिंदू आणि मुस्लीम यांच्यात दंगे घडवले. काँग्रेस केवळ मतपेढीचे राजकारण करीत आहेत, हे वारंवार सिद्ध झाले आहे, असे मोदी म्हणाले. महागाईने सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे. मात्र काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी कोणतीही परिणामकारक पावले उचलली नाहीत, असे मोदी यांनी बंदिकुरी येथे झालेल्या सभेत सांगितले.

मोदींच्या सभेत भाजप आमदारांच्या सत्कारावरून वाद
लखनऊ:मुझफ्फरनगरमध्ये चिथावण्या देऊन जातीय दंगल भडकाविल्याचे आरोप असलेले भाजपचे आमदार संगीत सोम आणि सुरेश राणा यांचा सत्कार करण्याचे भाजपकडून जाहीर करण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आह़े  गुरुवारी आग्य्रात होणाऱ्या भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या सभेत हा सत्कार करण्यात येणार आह़े सध्या जामिनावर असणाऱ्या या आमदारांचा सत्कार केल्यास ‘द्वेषाची परिस्थिती’ निर्माण होईल, अशी टीका करीत काँग्रेसने याबद्दल खेद व्यक्त केला आह़े  तर समाजवादी पक्षाने ‘ही भगव्या पक्षाची संस्कृतीच आहे,’ अशी खोचक टिप्पणी केली आह़े  भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी याबद्दल अनभिज्ञ असल्याचे म्हटले आह़े  

चोरांचा पक्ष
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए शासनाने गेल्या साडेनऊ वर्षांत तब्बल ४९ लाख कोटी रुपयांचे घोटाळे केले आहेत़  त्याची जबाबदारी टाळण्यासाठीच राहुल गांधी भाजपला ‘चोरांचा पक्ष’ असे संबोधत आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आह़े  खर तरं जेव्हा जेव्हा काँग्रेस सत्तेत आला, तेव्हा तेव्हा देशात महागाई आणि भ्रष्टाचार वाढला आह़े
– राजनाथ सिंग, राष्ट्रीय अध्यक्ष, भाजप़

चिदम्बरम यांची मोदींवर टीका
मुंबई :गुजरातसारख्या राज्यात पाठलाग करून आणि पाळत ठेवून संरक्षण दिले जाते, अशी टीका केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी मंगळवारी गुजरातमधील वादग्रस्त पाळत प्रकरणावर केली. पाळत ठेवण्यासाठी पदाचा गैरवापर केल्याचा ठपका अमित शहा यांच्यावर ठेवण्यात आला त्याबाबत वार्ताहरांनी विचारलेल्या प्रश्नाला चिदम्बरम यांनी वरील उत्तर दिले. हा संपूर्ण प्रकारच निषेधार्ह आहे, सुरक्षा पुरविणे म्हणजे पाठलाग करणे नव्हे त्याचप्रमाणे सुरक्षा पुरविणे म्हणजे पाळत ठेवणे नव्हे, असेही अर्थमंत्री म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Narendra modi slammed congress over the high inflation