नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून ३५ मिनिटे संवाद साधला. भारत-पाकिस्तान यांच्या संघर्षामध्ये वा दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये तिसऱ्या राष्ट्रांची मध्यस्थी भारताने कधी मान्य केली नव्हती व यापुढेही मान्य केली जाणार नाही, असे मोदींनी ट्रम्प यांना ठोस शब्दांत स्पष्ट केल्याचा दावा परराष्ट्र सचिव विक्रम मिस्राी यांनी प्रसारित केलेल्या चित्रफितीद्वारे केला. तसेच पाकिस्तानच्या विनंतीवरून संघर्ष थांबवण्यात आल्याचे मोदी यांनी नमूद केले.
‘जी-७’ राष्ट्रांच्या परिषदेसाठी मोदी कॅनडाच्या दौऱ्यावर होते. तिथे मोदी यांची ट्रम्प यांच्याशी प्रत्यक्ष भेट होणार होती. मात्र इस्रायल-इराण यांच्यातील संघर्षांमुळे ट्रम्प ही परिषद अर्ध्यावर सोडून अमेरिकेला परतल्यामुळे या दोन देशांच्या प्रमुखांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे ट्रम्प यांच्या विनंतीवरून मोदींनी फोनवरून ट्रम्प यांच्याशी संवाद साधल्याची माहिती मिस्राी यांनी चित्रफितीतून दिली. ऑपरेशन सिंदूरदरम्यान अमेरिकेशी कुठलीही व्यापारविषयक चर्चा झाली नाही. भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष थांबवण्याबाबतही अमेरिकेशी मध्यस्थीसंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही.
पाकिस्तानच्या धोरणाबाबत भारतात राजकीय एकमत आहे, असे मोदींनी ट्रम्प यांच्याशी संवाद साधताना अधोरेखित केले. ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीसाठी अमेरिकेने मध्यस्थी केल्याचा दावा ट्रम्प यांनी वारंवार केला होता. शिवाय, काश्मीरप्रश्न सोडवण्यासाठी देखील अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे विधान ट्रम्प यांनी केले होते. मात्र हे दोन्ही दावे केंद्र सरकारने फेटाळले होते.
ऑपरेशन सिंदूर व भारताच्या परराष्ट्र (पान ५ वर) (पान १ वरून) धोरणासंदर्भात मोदींनी घेतलेली भूमिका ऐकून घेतल्यानंतर ट्रम्प यांनी भारताच्या दहशतवादविरोधातील लढाईला पाठिंबा व्यक्त केला. ऑपरेशन सिंदूर का करावे लागले याची माहिती मोदींनी ट्रम्प यांना दिली. ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. पाकिस्तानी नागरिकांना लक्ष्य करण्यात आले नाही. पाकिस्तानकडून आलेल्या प्रस्तावानंतर शस्त्रसंधी केला गेला. ऑपरेशन सिंदूरसंदर्भात भारताची बाजू आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडली असल्याचेही मोदींनी ट्रम्प यांना लक्षात आणून दिले. पाकिस्तानने दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न केला तर गोळीचे प्रत्युत्तर तोफगोळ्यांनी दिले जाईल. पाकिस्तानचे दहशतवादी कृत्य युद्ध मानले जाईल. त्यामुळेच भारताचे ‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरू असल्याचे मोदींनी ठणकावले, अशी माहिती मिस्राी यांनी दिली.
ट्रम्प-मुनीर भोजन
पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या भारतविरोधी प्रक्षोभक भाषणानंतर पहलगाममध्ये दहशतवाही हल्ला केला. या हल्ल्याला दहशतवादी संघटनांप्रमाणेच मुनीर यांनाही भारताने जबाबदार धरले आहे. मोदींनी बुधवारी ट्रम्प यांच्याशी ऑपरेशन सिंदूरबाबत संवाद साधून भारताची भूमिका स्पष्ट केली असतानाच, भारतविरोधी जनरल असीम मुनीर यांच्यासाठी ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानी, व्हाइट हाऊसमध्ये भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला. भारतीय वेळेनुसार बुधवारी १८ जून रोजी रात्री दहा वाजता हा भोजन कार्यक्रम ठेवण्यात आल्याचे व्हाइट हाऊसने अधिकृतरीत्या जाहीर केले. अमेरिकेचे अध्यक्ष व पाकिस्तानचे लष्करप्रमुख यांच्यामध्ये बंद दरवाजाआड चर्चा होणार असून त्या संदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद वा निवेदन दिले जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले. या भेटीमध्ये इस्रायल-इराण यांच्यातील संघर्षाबाबत प्रामुख्याने चर्चा केली जाणार असल्याचे सांगितले गेले.
ट्रम्प यांचे निमंत्रण धुडकावले!
कॅनडाहून थेट अमेरिकेला येण्याचे ट्रम्प यांचे निमंत्रण मोदींनी धुडकावल्याचेही मिस्राी यांनी सांगितले. मोदींनी अमेरिकेला जाण्यापेक्षा क्रोएशियाला जाण्यास अधिक पसंती दिली. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे अमेरिकेला येणे शक्य नसल्याचे मोदींनी ट्रम्प यांना सांगितले. त्यामुळे नजीकच्या भविष्यात दोन्ही देशांचे नेते एकमेकांना भेटू शकतील. दोन्ही नेत्यांमध्ये इस्रायल-इराण तसेच युक्रेन-रशिया संघर्षावरही सविस्तर चर्चा झाली. क्वॉड समूहदेशांच्या बैठकीसाठी मोदींनी ट्रम्प यांना भारतभेटीचे आमंत्रण दिले.