मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ थोडक्यात बचावले आहेत. रविवारी कमलनाथ आणि इतर काँग्रेस नेते असणारी लिफ्ट १० फूट खाली कोसळून दुर्घटना घडली. दुर्घटनेनंतर लिफ्टचे दरवाजे उघडत नसल्याने इंजिनिअरला बोलावण्यात आलं होतं. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालं नाही. काँग्रेसने ही सुरक्षेतील खूप मोठी त्रुटी असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय झालं?
कलमनाथ आणि इतर नेते माजी मंत्री रामेश्वर पटेल यांना भेटण्यासाठी इंदूरमधील एका खासगी रुग्णालयात गेले होते. यावेळी काँग्रेस नेते सज्जन सिंग वर्मा, आणि जितू पातवारी त्यांच्यासोबत होते. रुग्णालयात पोहोचल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी लिफ्टचा वापर केला. मात्र यावेळी लिफ्टमध्ये बिघाड झाल्याचं निदर्शनास आलं.

जेव्हा कलमनाथ आणि इतर नेते वरच्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टमध्ये शिरले, त्यावेळी लिफ्ट वर जाण्याऐवजी थेट १० फूट खाली कोसळली. दुर्घटनेनंतर कमलनाथ यांच्या सुरक्षारक्षकांनी धाव घेतली. यावेळी लिफ्टचे दरवाजे उघडले जात नव्हते. त्यामुळे तात्काळ इंजिनिअरला बोलावण्यात आलं आणि लिफ्टचा दरवाजा तोडून सर्वांना बाहेर काढण्यात आलं. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालं नाही.

दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी कमलनाथ यांची फोन करुन चौकशी केली. शिवराज सिंग चौहान यांनी ट्विट करत याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narrow escape for former mp cm kamal nath as elevator drops 10 feet sgy
First published on: 22-02-2021 at 09:01 IST