नासाच्या स्पिट्झर या इन्फ्रारेड दुर्बिणीला दहा वर्षे पूर्ण झाली असून ती अजूनही व्यवस्थित काम करीत आहे. दहा वर्षांपूर्वी डेल्टा-२ अग्निबाणाने ही दुर्बीण अवकाशात सोडण्यात आली होती. नासाच्या एकूण चार दुर्बिणी अवकाशात असून त्यातील स्पिट्झर दुर्बिणीने विश्वाचे अनोखे दर्शन मानवाला घडवले आहे.
या दुर्बिणीने धुमकेतू, लघुग्रह यांच्या अभ्यासाबरोबरच ताऱ्यांची संख्या मोजली आहे. ग्रह व दीर्घिकांची छाननी केली आहे. त्याचबरोबर अवकाशातील फुटबॉलच्या आकारातील कार्बनी गोल म्हणजे बकीबॉल शोधून काढले आहेत. आता ही दुर्बीण दुसऱ्या दशकात प्रवेश करीत असून जवळच्या व लांबच्या विश्वाचा वेध ती घेत राहील, असे नासाने म्हटले आहे. पृथ्वी निकटचा एखादा लघुग्रह शोधून तो पकडणे, त्याला वेगळी दिशा देणे या स्वरूपाची मोहीम  यशस्वी करण्यातही यापुढे स्पिट्झर दुर्बीण मोठी भूमिका पार पाडणार आहे.
नासाच्या स्पिट्झर दुर्बिणीच्या मदतीने नेमके कोणत्या लघुग्रहाचे सखोल संशोधन करायचे याचा निर्णय घेतला जाणार आहे, असे नासाचे सहायक प्रशासक जॉन ग्रन्सफेल्ड यांनी सांगितले.
स्पिट्झर दुर्बिणीचे वैशिष्टय़ म्हणजे विश्वाच्या दूरवरील धुळीने भरलेल्या शीत भागाचे निरीक्षण करणे शक्य झाले. टेम्पल १ या धूमकेतूची खूप चांगली निरीक्षणे त्याने नोंदवली होती. त्यात टेम्पल-१ धूमकेतूची रचना नेमकी कशी आहे यावर या दुर्बिणीने प्रकाश टाकला. त्याशिवाय शनिच्या सर्वात मोठय़ा कडय़ाचा शोध लावला. हे मोठे कडे म्हणजे बर्फ व धुळीचे कण यांचे मिश्रण आहे. ते कडे प्रकाशात अंधूक दिसते, पण स्पिट्झर दुर्बिणीच्या अवरक्त किरण शोधकांनी या कडय़ाचे अस्तित्व त्यापासून निघणाऱ्या अंधूक प्रकाशाच्या मदतीने ओळखले होते.या दुर्बिणीने आपल्या सौरमालेच्या बाहेर असलेल्या एका ग्रहाकडून येणारा प्रकाशही टिपला होता. प्रत्यक्षात या मोहिमेच्या आराखडय़ात त्याचा समावेश नव्हता. स्पिट्झर दुर्बिणीच्या मदतीने आपल्या निकटच्या मेघांमध्ये जन्माला येणाऱ्या ताऱ्यांची गणना, आकाशगंगेच्या सर्पिलाकार रचनेचा नवीन नकाशा तयार करणे अशा अनेक बाबींत यश आले. ऑक्टोबरमध्ये स्पिट्झर दुर्बीण २००९ डीबी या पृथ्वी निकटच्या लघुग्रहाचे निरीक्षण करणार आहे, त्यात या लघुग्रहाचा नेमका आकार निश्चित केला जाणार आहे. लघुग्रह पकडून त्याची दिशा बदलण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून हे पहिले पाऊल असणार आहे.