बोगोटा (कोलंबिया) : कोलंबियामध्ये गुरुवारी कार बॉम्बस्फोटासह आणि पोलिसांच्या हेलिकॉप्टरवर झालेल्या हल्ल्यात किमान १७ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी दोन्ही हल्ल्यांसाठी निष्क्रिय झालेल्या कोलंबियाच्या क्रांतिकारी सशस्त्र दलातील फुटीर गटाला जबाबदार धरले आहे.

कोकेनसाठी कच्चा माल असलेल्या कोका पानच्या पिकांवर कारवाई करण्यासाठी उत्तर कोलंबियातील अँटिओक्विया येथील एका भागात कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरवर झालेल्या हल्ल्यात किमान १२ पोलीस अधिकारी ठार झाले. पेट्रो यांनीने सुरुवातीला आठ अधिकारी ठार झाल्याचे वृत्त दिले होते, परंतु नंतर इतर चार जणांचा मृत्यू झाला आणि तीन जण जखमी झाल्याचे अँटिओक्वियाचे गव्हर्नर आंद्रेस ज्युलियन यांनी सांगितले. अँटिओक्वियाच्या गव्हर्नरने यांनी ‘एक्स’वर सांगितले की कोका पानांच्या पिकांची पाहणी करत असताना, हेलिकॉप्टरवर ड्रोनने हल्ला झाला. तर प्राथमिक माहितीनुसार हल्ल्यामुळे विमानात आग लागली, असे कोलंबियाचे संरक्षणमंत्री पेड्रो सांचेझ म्हणाले.

दंगल प्रकरणात इम्रान खान यांच्या भाच्याला अटक

लाहोर : तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे भाचे शहरेज खान यांना ९ मे २०२३ च्या दंगलींच्या प्रकरणात अटक करण्यात आल्याचे पंजाब पोलिसांनी शुक्रवारी सांगितले. तसेच दावा केल्याप्रमाणे त्यांचे अपहरण झालेले नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले. इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाने गुरुवारी निवेदन जारी केले होते. त्यात शहरेज खान यांचे त्यांच्या घरातून अपहरण झाल्याचा दावा करण्यात आला होता. इम्रान खान यांचे सहकारी झुल्फि बोखारी यांनी सांगितले की, ‘गुरुवारी रात्री साध्या वेशातील काही व्यक्तींनी इम्रान खान यांची बहीण अलिमा खानुम यांच्या घरी प्रवेश करत घरातील कर्मचाऱ्यांना मारहाण केली. त्यानंतर अलिमा यांचा मुलगा शहरेज खान यांचे अपहरण केले.’

संभल मशीदप्रकरणी ‘जैसे थे’चे आदेश, नोटीस जारी

नवी दिल्ली: संभल मशीद वाद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने २५ ऑगस्टपर्यंत ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचे आदेश देतानाच हिंदू पक्षकारांना शुक्रवारी नोटीस बजावली. यासंदर्भातील आदेश न्यायमूर्ती पी.एस. नरसिम्हा आणि ए.एस. चांदुरकर यांनी जारी केले. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या मशीद समितीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शाही जामा मशीद आणि हरिहर मंदिर वादात संभल येथील न्यायालयाने दिलेल्या सर्वेक्षणाविरुद्ध उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती आणि सर्वेक्षणासाठी दिवाणी न्यायालयाचा निर्देश कायम ठेवला होता. तसेच न्यायालयीन आयुक्त नियुक्त करण्याचा आदेशही कायम ठेवला होता.

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांकडून ‘आरएसएस’च्या प्रार्थनेचे गायन

बंगळूरु : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री तथा राज्यातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी विधानसभेतील चर्चेदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रार्थनेचे गायन केल्याने सर्वच आश्चर्यचकित झाले. चिन्नास्वामी क्रीडांगणाबाहेरील चेंगराचेंगरीवर विधानसभेत चर्चा सुरू असताना हा प्रकार घडला. सभागृहाच्या कामकाजाच्या चित्रफितीत दाखवल्याप्रमाणे ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमे’ या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रार्थनेच्या पहिल्या काही ओळींचे त्यांनी गायन केले. विधानसभेत विरोधी भाजप आमदारांनी गोंधळ घालत चेंगराचेंगरीला शिवकुमार जबाबदार असल्याचा आरोप केला. त्यानंतर शिवकुमार यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले.