मागील वर्षी आर्ट ऑफ लिव्हिंगने यमुनेच्या पूरप्रवण क्षेत्रामध्ये वर्ल्ड कल्चरल फेस्टिवल या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामुळे या ठिकाणच्या वनस्पती आणि पर्यावरणाचे एकूण नुकसान झाले आहे. असा निष्कर्ष हरित लवादाने नेमलेल्या समितीने काढला आहे. हे नुकसान भरुन काढण्यासाठी प्रयत्न केला असता त्यासाठी १३.२९ कोटी रुपये खर्च येईल असे या समितीने म्हटले आहे.

वर्ल्ड कल्चरल फेस्टिवलमुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी खूप खर्च येईल आणि ही रक्कम साडे तेरा कोटींच्या घरातील असेल असे या समितीने म्हटले आहे. मागील वर्षी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात देश-विदेशातील कलाकार आले होते. कार्यक्रमासाठी यमुना नदीच्या पात्रामध्ये बदल करण्यात आले होते. हा कार्यक्रम घेण्यात आला तर या ठिकाणी असलेल्या पर्यावरणाला हानी पोहचेल असे त्यावेळी हरित लवादाने म्हटले होते. त्याकडे दुर्लक्ष करुन आर्ट ऑफ लिव्हिंगने हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला देश विदेशातील मान्यवर उपस्थित होते.

आम्ही या प्रकरणाचा अभ्यास करत असून समिचीच्या अहवालाची प्रत आमच्या हाती आल्यानंतर आम्ही कायदेशीर पावले उचलू असे आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रवक्ते केदार देसाई यांनी म्हटले आहे.या आधी हरित लवादाने नुकसान भरपाई म्हणून ५ कोटी रुपयांचा दंड भरण्याची सूचना आर्ट ऑफ लिव्हिंगला केली होती. वेळ पडल्यास आपण तुरुंगात जाऊ पंरतु दंड भरणार नाही असे आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रमुख श्री श्री रविशंकर यांनी म्हटले होते.