पीटीआय, नवी दिल्ली
‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सादर केलेल्या आरोपपत्रानंतर काँग्रेसने देशभरात ‘ईडी’ कार्यालयांबाहेर आणि इतर ठिकाणी आंदोलने केली. दिल्लीसह जम्मू-काश्मीर, पंजाब, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, कर्नाटक, नागालँड, आसाम, मणिपूरसह देशात अनेक ठिकाणी आंदोलने झाली.

जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस नेत्यांच्या मोर्चाला पोलीसांनी अटकाव केला तर कर्नाटकमध्ये बंगळुरू येथे ईडी कार्यालयाबाहेर काँग्रेसने आंदोलन केले. नागालँडमध्ये दिमापूर येथे प्राप्तिकर खात्याच्या अतिरिक्त आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर कोहिमा येथील काँग्रेस भवन येथे निदर्शने करण्यात आली.

आसाममध्ये गुवाहाटी येथे प्रदेशाध्यक्ष भुपेनकुमार बोरा आणि इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी निदर्शने केली. काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना या वेळी पोलिसांनी ताब्यात घेतले. मणिपूरमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेघाचंद्र यांनी भाजपवर टीका केली. ईडी कार्यालयाबाहेर या वेळी आंदोलन करण्यात आले.

झारखंडमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष केशव माहतो कमलेश आणि राज्य प्रभारी के. राजू यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. ओडिशामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चरण दास आणि इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आंदोलन छेडले. पश्चिम बंगालमध्ये कोलकाता येथे ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन झाले. सुरक्षा दलातील जवानांबरोबर या वेळी कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली. याखेरीज, पंजाब, बिहार येथे आंदोलने झाली.

पोलिसांशी झटापटीत खासदार वर्षा गायकवाड जखमी

राहुल गांधी यांच्या वाढत्या लोकप्रियतेची भाजपा नरेंद्र मोदी यांना भीती वाटत आहे म्हणूनच खोटे खटले आणि बनावट आरोप लावून आवाज दडपला जात आहे. आंदोलनावेळी आपल्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करण्यात आली, अमानवी पद्धतीने ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी गृहमंत्र्यांनी माफी मागावी व संबंधित पोलिसांवर कारवाई करावी.

वर्षा गायकवाड, खासदार, काँग्रेस

स्वत:ची पापे झाकण्यासाठी या जुलमी सरकारला काँग्रेसला लक्ष्य करण्यासाठी पुढे सरसावले आहे. कुठलेही ध्येय, उद्दिष्ट त्यांच्यासमोर नाही. त्यामुळेच अन्य घटनांकडे लक्ष वळविण्याचा हा प्रयत्न आहे.

मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस

देशाला लुटण्याचा कुणालाही परवाना दिलेला नाही. घोटाळ्याबाबत कायद्यानुसार योग्य ती कारवाई होईल. हे सूडाचे राजकारण नाही.

रविशंकर प्रसाद, भाजप नेते आणि माजी कायदामंत्री

रॉबर्ट वढेरा लवकरच राजकारणात सक्रिय

नवी दिल्ली : ‘मी १९९९ पासून लोकांमध्ये काम करीत असून, आता जवळजवळ पूर्ण कार्यकर्ता झालो आहे. लवकरच राजकारणात सक्रिय होईन,’ अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे मेहुणे आणि प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांनी बुधवारी दिली. दरम्यान ईडीने सलग दुसऱ्या दिवशी त्यांची चौकशी केली. नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून देशभर आंदोलने सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दावा केला, की गांधी कुटुंबाचा भाग असल्याने चौकशी यंत्रणा जाणीवपूर्वक आपल्याला लक्ष्य करीत आहेत. ‘मी भाजप परिवाराचा एक भाग असतो, तर या गोष्टी झाल्या नसत्या. आम्हाला तुम्ही जितका त्रास द्याल, तितके आम्ही मजबूत होऊ,’ अशी प्रतिक्रिया वढेरा यांनी दिली. ईडीने वढेरा यांची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी केली. हरियाणा येथील २००८ मधील जमीन प्रकरणात त्यांची चौकशी झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिल्लीत मोठी निदर्शने

अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईडीने सोनिया आणि राहुल गांधी यांच्याविरोधात सादर केलेल्या आरोपपत्राविरोधात मोठी निदर्शने केली. कार्यकर्त्यांची मोठी गर्दी या ठिकाणी जमली होती. सरकारविरोधात कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. सरकारची ही कारवाई म्हणजे सूडाचे राजकारण असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसने व्यक्त केली.