पीटीआय, नवी दिल्ली/ नांदेड/कोल्हापूर : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) रविवारी महाराष्ट्रातील नांदेड, कोल्हापूरसह उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश आणि केरळमध्ये छापे घातले. त्यात दहशतवादी संघटनांशी संबंधांच्या संशयावरून उत्तर प्रदेशात मदरशातून कर्नाटकातील एका विद्यार्थ्यांला अटक करण्यात आली.

महाराष्ट्रात ‘आयसीस’ या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून ‘एनआयए’ने रविवारी पहाटे ४.३० वाजता रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील अल्ताफ आणि इर्शाद शेख या सख्ख्या भावांच्या घरावर छापा टाकला. दिवसभर चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आले. छाप्यानंतर रेंदाळमध्ये संतप्त जमावाने संशयावरून शेख बंधूंच्या कार्यालयाची मोडतोड केली. चांदीनगरी हुपरी, रेंदाळ परिसरात चांदीचे दागिने तयार करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे.  नांदेडमध्येही ‘आयसीस’शी संबंधांच्या संशयावरून शहराच्या इतवारा भागातून तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांची दिवसभर चौकशी करण्यात आली. १४ तासांच्या  चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले. मात्र व्हॉट्सअ‍ॅप संवाद झालेला मोबाइल आणि इतर संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली.  ‘एनआयए’ने ‘आयसीस’शी संबंधित एका प्रकरणात गुजरातच्याही चार जिल्ह्यांत शोधमोहीम राबवून तिघांची चौकशी केली. भडोच, सुरत, नवसारी आणि अहमदाबाद जिल्ह्यांतील छाप्यांत काही कागदपत्रे आणि साहित्य जप्त करण्यात आले. मध्य प्रदेशच्या भोपाळ आणि रायसेन जिल्ह्यातही काही संशयितांच्या घरांवर छापा टाकण्यात आला.

‘एनआयए’ने केरळमध्येही सथिक बाचा ऊर्फ आयलीएएमए सथिक याच्या अटकेच्या अनुषंगाने शोधमोहीम राबवली. सथिक बाचा याने अन्य चार साथीदारांसह गेल्या फेब्रुवारीमध्ये वाहन तपासणीवेळी पोलिसांना मारण्याचा प्रयत्न केला होता. तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील या शोधमोहिमेत काही डिजिटल उपकरणे आणि कागदपत्रे जप्त करण्यात आल्याचे एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशात विद्यार्थ्यांला अटक

उत्तर प्रदेशातून अटक केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव फारूख असे आहे. तो सहारणपूरमधील देवबंद येथील मदरशात राहात होता. या विद्यार्थ्यांला अनेक भाषा येत असून तो समाजमाध्यमांद्वारे ‘आयएसआय’ या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेशी संबंधित एका दहशतवादी गटाच्या संपर्कात होता.