NATO chief warn india Brazil and china over Russia trade : युक्रेन आणि रशिया यांच्यात गेल्या काही वर्षांपासून युद्ध सुरू आहे. यादरम्यान आता रशियाच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर नाटोने कठोर भूमिका घेतली असून रशियाबरोबर व्यापारी संबंध ठेवणाऱ्या देशांना इशारा देण्यात आला आहे. रशियाबरोबर व्यापार करणाऱ्या ब्राझील, चीन आणि भारत यासारख्या देशांवर कठोर निर्बंध लादण्याचा इशारा नाटोचे सेक्रेटरी जनरल मार्क रुट्टे (Mark Rutte) यांनी बुधवारी दिला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला नवीन शस्त्रात्रे पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच येत्या ५० दिवसात शांतता करार झाला नाही तर, जे देश रशियाने निर्यात केलेला माल विकत घेत आहेत, त्यांच्यावर १०० टक्के सेकंडरी टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर रुट्टे यांनी अमेरिकन काँग्रेसच्या सदस्यांची भेट घेतली आणि भारत, चीन आणि ब्राझील या देशांना हा इशारा दिला आहे.
नाटोचे प्रमुख काय म्हणाले?
“माझे या तीन देशांना सांगणे आहे, विशेषतः जर तुम्ही बीजिंग किंवा दिल्लीत राहात असाल किंवा तुम्ही ब्राझीलचे अध्यक्ष असाल, तर तुम्हाला याकडे लक्ष द्याण्याची गरज आहे, कारण याचा तुम्हाला मोठा फटका बसू शकतो,” असे रुट्टे यांनी माध्यामांशी बोलताना सांगितले. रुट्टे यांनी सोमवारी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली आणि यासंबंधीत नवीन पावले उचलण्याबाबत सहमती देखील दर्शवली.
“त्यामुळे कृपया व्लादिमीर पुतिन यांना फोन करा आणि त्यांना सांगा की त्यांना शांतता चर्चेबाबत गंभीर होण्याची आवश्यकता आहे, कारण अन्यथा याचा ब्राझील, भारत आणि चीन यांच्यावर मोठा परिणाम होईल,” असेही रुट्टे म्हणाले.
रिपब्लिकन अमेरिकन सिनेटर थॉम टिल्लिस (Thom Tillis) यांनी हा निर्णय जाहीर केल्याबद्दल ट्रम्प यांचे कौतुक केले आहे, पण त्यांनी ५० दिवसांच्या मुदतीबाबत काळजी वाटत असल्याचेही म्हटले आहे. त्यांनी चिंता व्यक्त केली की, पुतीन हे या ५० दिवसांचा वापर युद्ध जिंकण्यासाठी करू शकतात किंवा जास्त जमीन ताब्यात घेऊन शांतता कराराच्या वाटाघाटींसाठी स्वत:ची स्थिती मजबूत करू शकतात . त्यामुळे आपण आजची युक्रेनची स्थिती लक्षात घेता, येत्या ५० दिवसात त्यांनी काहीही केले तरी आणि कितीही लाभ मिळवला तरी तो चर्चेदरम्यान ग्राह्य धरला जाणार नाही असे स्पष्ट करायला हवे, असेही टिल्लिस पुढे बोलताना म्हणाले.
शांततेच्या चर्चेदरम्यान युक्रेन शक्य तितक्या चांगल्या स्थितीत राहावा यासाठी युरोपला पैसे मिळकील असे रुट्टे यांनी सांगितले. ते म्हणाले की, ट्रम्प यांच्याबरोबर झालेल्या सहमतीनुसार, अमेरिका युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे, फक्त एअर डिफेन्सच नाही तर याबरोबर युरोपियन लोकांच्या खर्चातून क्षेपणास्त्रे, दारूगोळा देखील पुरवला जाईल.