नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर १८ दिवसांनी अखेर तो मागे घेतला आहे. नाराज असलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांनी शुक्रवारी राहुल गांधी यांची भेट घेतली आणि यानंतर राजीनाम्याचा आपला निर्णय मागे घेत पुन्हा एकदा धक्का दिला. राहुल गांधी भेटीनंतर बोलताना त्यांनी आपल्याला वाटत असलेली काळजी, विचार आपण त्यांच्यासमोर मांडले असून आता सर्व काही ठीक झालं असल्याचं सांगितलं. पंजाबचे प्रभारी हरीश रावत यांनी ही माहिती दिली.

सिद्धू यांनी अचानक राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याने पंजाब काँग्रेसमध्ये खळबळ उडाली होती. यानंतर ते काँग्रेसलाही सोडचिठ्ठी देतील असे अंदाज वर्तवले जात होते. मात्र दसऱ्याच्या मुहुर्तावर राहुल गांधी यांची भेट घेत सिद्धू यांनी राजीनामा मागे घेत असल्याचं जाहीर केलं.

“त्यांनी (सिद्धू) आपले मुद्दे राहुल गांधींसमोर मांडले. यावेळी त्यांना या सर्व गोष्टींची काळजी घेतली जाईल असं सांगण्यात आलं. यावेळी त्यांनी राजीनामा मागे घेत पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली जाईल असं आश्वासन दिलं,” अशी माहिती हरीश रावत यांनी दिली आहे.

२८ ऑक्टोबरला राजीनामा दिल्यानंतर सिद्धू यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे केंद्रीय नेतृत्वही गोंधळात पडलं होतं. कारण सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष करण्याचा निर्णय नेतृत्वाकडून घेण्यात आला होता. एकीकडे ज्या दिवशी काँग्रेस कन्हैय्या कुमार आणि जिग्नेश मेवानी यांचं पक्षात स्वागत करत होती तिथे दुसरीकडे सिद्धू यांनी राजीनामा देत खळबळ उडवली होती. यावरुनच सोनिया गांधी आणि राहुल गांधी नाराज होते.

सिद्धू काय म्हणाले –

“मी हायकमांडला माझ्या मनात असणाऱी काळजी सांगितली आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी जो काही निर्णय घेतील तो पंजाबसाठी असेल यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मी त्यांनी सर्वोच्च मानत असून त्यांच्या आदेशाचं पालन करत आहे,” असं सिद्धू यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितलं.