पंजाबचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी त्यांच्याच पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी विजेचे दर तीन रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय ‘लॉलीपॉप’ असल्याचं सिद्धू यांनी म्हटलंय. आपल्याच पक्षाच्या सरकारवर टीका करत सिद्धूंनी घरचा अहेर दिला आहे. तसेच पंजाबच्या कल्याणाशी संबंधित अजेंड्यावरच मतदान करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले. मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी घरगुती क्षेत्रातील वीज दरात प्रति युनिट ३ रुपये कपात आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा केली आहे.

पंजाबमधील संयुक्त हिंदू महासभेच्या एका कार्यक्रमात सिद्धू यांनी राज्याच्या कल्याणाविषयी कोणी बोलेल का, असा सवाल केला. सिद्धू म्हणाले, “हे फुकट आहे, ते फुकट आहे, असं म्हणत ते लॉलीपॉप देतात.  ते या दोन महिन्यांत होणार आहे. कारण पुढच्या वर्षी पंजाब विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. जे राजकारणी आश्वासनं देत आहेत, ती आश्वासनं कशी पूर्ण करणार?” असा प्रश्न सिद्धूंनी उपस्थित केला. 

राज्याच्या कल्याणाबद्दल बोलत त्यांनी लोकांना लॉलीपॉप नाही तर विकासाच्या अजेंड्यावर मतदान करण्यास सांगितले. “कोणत्या पक्षाचा हेतू हा केवळ सत्ता स्थापनेचा आहे की खोटं बोलून सत्तेत येण्याचा, याच्याबद्दल तुमच्‍या मनात प्रश्‍न उपस्थित व्हायला हवे,” असं सिद्धू जनतेला म्हणाले.