रशियन सैन्य किव्हजवळ, प्रतिकाराचा युक्रेनचा निर्धार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रशियाने युक्रेनची राजधानी किव्ह, ईशान्येकडील खार्किव्ह आणि दक्षिणेकडील खेरसन या तीन शहरांवर हल्ला करण्यासाठी आक्रमणरेषा निश्चित केल्या असून या तिन्ही शहरांच्या संरक्षणाचा निर्धार युक्रेनने व्यक्त केला. दरम्यान, रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत काही सैनिक आणि तीन मुलांसह १९८ जणांचा मृत्यू झाल्याचे युक्रेनच्या आरोग्यमंत्र्यांनी शनिवारी सांगितले. 

रशियाचे सैन्य युक्रेनची राजधानी किव्हच्या आणखी जवळ पोहोचल्याने शहरातील प्रशासनाने संचारबंदी लागू करण्याबरोबरच रहिवाशांना भूमिगत आश्रयस्थानांवर पाठवले आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी शनिवारी ट्विटरवर एक दृकश्राव्य संदेश प्रसारित करून किव्ह शहरावर रशियाने ताबा मिळवल्यासारख्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन नागरिकांना केले. ‘‘किव्ह वाचवण्यासाठी आता खरी लढाई सुरू झाली आहे. आम्ही शस्त्र खाली ठेवणार नाही. आम्ही आमच्या देशाचे रक्षण करू. ही आमची जमीन आहे, हा आमचा देश आहे, ही आमची मुले आहेत आणि आम्ही त्या सर्वाचे रक्षण करू, आम्ही जिंकू, असा निर्धार झेलेन्स्की यांनी या संदेशात व्यक्त केला आहे.

अमेरिकेचे स्थलांतराचे आवाहनही युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी धुडकावले आणि रशियाला प्रतिकार करण्याचा निर्धार व्यक्त केला. आमच्या देशात युद्ध सुरू आहे, त्यामुळे आम्हाला इथेच थांबावे लागेल, असे झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले. आणखी एका ध्वनीफितीत झेलेन्स्की यांनी, रशिया निवासी भागांवर आणि पायाभूत सुविधांवर हल्ले करीत असल्याचा आरोप केला.

युक्रेनवरील हल्ला हा केवळ लष्करी तळांना लक्ष्य करण्यासाठीच आहे, असा दावा रशियाने केला असला तरी किव्ह शहराच्या र्नैऋत्येला असलेल्या एका उच्चभ्रू निवासी इमारतीवर शुक्रवारी रात्री क्षेपणास्त्र आदळले. त्यामुळे या इमारतीला भगदाडे पडली आणि काही नागरिक जखमी झाल्याचे वृत्त आहे.

रशियाने दोन दिवस क्षेपणास्त्र हल्ला केला. त्यांत मोठय़ा प्रमाणावर पडझड झाली. रशियाचे सैन्य शनिवारी उत्तर, पूर्व आणि दक्षिणेकडून राजधानी किव्हच्या दिशेने पुढे सरकत असताना जमिनीवरील लढाईला तोंड फुटले. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी रशियाचे हल्ले रोखण्यात काही प्रमाणात यश मिळवले, परंतु राजधानी किव्हजवळ लढाई सुरू आहे. रशियाच्या हल्ल्यात पूल, शाळा आणि निवासी इमारतींचीही पडझड झाली आणि शेकडो नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा युक्रेनने केला.

रशियाने उत्तरेकडील किव्ह, ईशान्येकडील खार्किव्ह आणि दक्षिणेकडील खेरसन या तीन शहरांमध्ये आक्रमणरेषा निश्चित केल्या आहेत. युक्रेनियन सैन्यही तिन्ही शहरांना ताब्यात ठेवण्यासाठी निकराने लढत असल्याचे वृत्त आहे.

रशिया-युक्रेन संघर्षांमुळे आधीच युक्रेनमधील हजारो नागरिकांनी स्थलांतर केले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे सव्वा लाखाहून अधिक नागरिक पोलंड, मोल्दोव्हा आणि इतर शेजारी देशांमध्ये निर्वासित म्हणून दाखल झाले आहेत.

एक हजार रशियन सैनिक मारल्याचा दावा

गुरुवारी रात्री रशियाने आक्रमण केल्यापासून आतापर्यंत तीन मुलांसह १९८ नागरिक ठार झाले, तर एक हजारहून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती युक्रेनच्या आरोग्यमंत्र्यांनी शनिवारी दिली. मात्र किती सैनिक आणि नागरिकांचा मृत्यू झाला, हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही. या संघर्षांत एक हजार रशियन सैनिक मारले गेल्याचा दावा युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी केला असला तरी रशियाने मात्र जीवितहानीची आकडेवारी जाहीर केलेली नाही.

युद्धस्थिती..

– रशियाने युक्रेनचे मेलिटोपोल ताब्यात घेतल्याचे आणि किव्हसह अनेक शहरांवर क्षेपणास्त्र मारा केल्याचे वृत्त.

– युक्रेनच्या सैन्याने पश्चिम युक्रेनमधील ल्विव्ह प्रदेशात रशियाचा हल्ला परतवून लावल्याचा ल्विव्हच्या महापौरांचा दावा.

– रशियाच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी युक्रेनला संरक्षणात्मक लष्करी उपकरणे पाठवण्याचा फ्रान्सचा निर्णय.

– व्यापार निर्बंधांचे उल्लंघन केल्याच्या संशयावरून रशियन कंपनीचे जहाज फ्रेंच सागरी पोलिसांकडून जप्त.

– युक्रेन सरकार उलथवून शांततेच्या वाटाघाटी करण्याचे रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचे युक्रेनच्या लष्कराला आवाहन.

– कोणत्याही अटी-शर्तीविना युद्धविराम वाटाघाटी करण्यास तयार असल्याचे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांचे स्पष्टीकरण.

संयुक्त राष्ट्रांत भारत तटस्थ.. रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याबाबत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत शुक्रवारी मांडलेल्या ठरावावरील मतदानाच्या वेळी भारत तटस्थ राहिला.  हा ठराव अमेरिकेने मांडला होता. त्यावर रशियाने नकाराधिकार वापरला, तसेच भारत, चीन आणि संयुक्त अरब अमिराती मतदानाच्या वेळी तटस्थ राहिले. त्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला आणि संयुक्त राष्ट्रात ‘‘राजकीय पाठिंबा’’ देण्याची विनंती केली.

मोदी- झेलेन्स्की चर्चा : युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी युद्धस्थितीची सविस्तर माहिती दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीवित आणि मालमत्ता हानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले, असे पंतप्रधान कार्यालयाने सांगितले. हिंसाचार थांबवून दोन्ही देशांनी वाटाघाटी करण्याचे आवाहन करण्याबरोबरच शांतता प्रस्थापित करण्यासाठी योगदान देण्याची इच्छा मोदी यांनी व्यक्त केली.

निर्वासित शेजारी देशांत..

’युद्धाची तीव्रता वाढली तर युक्रेनमधील सुमारे ४० लाख लोक शेजारी देशांमध्ये निर्वासित म्हणून स्थलांतर करतील, असा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केला.

’पोलंड, मोल्दोव्हा आणि इतर शेजारी देशांमध्ये युक्रेनचे निर्वासित दाखल झाल्याची माहितीही संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यांची संख्या सव्वा लाखाच्या घरात आहे.

’एकटय़ा पोलंडमध्ये सुमारे एक लाख निर्वासित दाखल झाले असून त्यांना क्रीडा संकुले, रेल्वे स्थानकांवर आश्रय देण्यात आला आहे. 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Near russian military kiev ukraine determination to resist number of war victims 198 akp
First published on: 27-02-2022 at 01:05 IST