राहुल गांधी यांनी ऑगस्ट महिन्यात एक पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये त्यांनी भाजपावर आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. त्यांना भाजपाने तोडीस तोड उत्तर दिलं आहे. दरम्यान आपला शेजारी देश नेपाळमध्ये गेल्या तीन दिवसांपासून संघर्ष पेटला आहे. नेपाळच्या तरुणांनी मोदींसारखा नेता हवा असं म्हटलं आहे. हा व्हिडीओ भाजपाने पोस्ट करत राहुल गांधींना लक्ष्य केलं आहे.
नेपाळमध्ये काय घडलं आहे?
भारताचा शेजारी देश नेपाळमधील राजकीय स्थिती कमालीची तणावपूर्ण झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून नेपाळमधील Gen Z आणि मोठ्या संख्येने तरुणाई रस्त्यांवर उतरून नेपाळ सरकारविरोधात आंदोलन करताना दिसत आहे. आधी सोशल मीडिया साईट्सवर बंदी घातल्याचा निषेध या तरुणाईनं केला. त्यावर १९ तासांनी ही बंदी सरकारला उठवावी लागली. मात्र, त्यानंतरदेखील रस्त्यावर उतरलेल्या तरुणाईचा असंतोष कमी झाला नाही. देशातील वाढत्या भ्रष्टाचाराचा निषेध करण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
नेपाळची तरुणाई काय म्हणत आहे?
“नेपाळमध्ये मोदींसारखा नेता असला पाहिजे. मोदींसारखा माणूस या ठिकाणची परिस्थिती बदलू शकतो. भ्रष्टाचार संपून जाईल. गेल्या अनेक वर्षांपासून या देशात भ्रष्टाचार सुरु आहे. मोदींसारखं नेतृत्व नेपाळला लाभलं असतं तर नेपाळची प्रगती जगाने पाहिली असती.” असं तरुण एका व्हिडीओत म्हणत आहेत. दरम्यान भाजपाचे नेते अमित मालवीय यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि राहुल गांधींवर टीका केली आहे.
काय म्हणाले अमित मालवीय?
काँग्रेसकडून आणि त्यांचे नेते राहुल गांधींकडून मोदींचा अपप्रचार केला जातो. राहुल गांधी हे जेन झेडचे नेते आहेत हे दाखवण्याचा अपयशी प्रयत्न होतो. त्यामुळेच त्यांचे रिल्स, बाईकस्वारीचे फोटो, व्हिडीओ हे पोस्ट केले जातात. मात्र जरा नेपाळची तरुणाई काय म्हणते आहे बघा. राहुल गांधी तुम्ही जे काही स्वतःबाबत सिद्ध करु पाहता आहे त्यापेक्षा वास्तव वेगळं आहे. नेपाळमध्ये मोदींसारखा माणूस हवा होता असं तरुण म्हणत आहेत. जरा हा व्हिडीओ बघा असं म्हणत अमित मालवीय यांनी राहुल गांधींना डिवचलं आहे.
आत्तापर्यंत नेपाळमध्ये १९ आंदोलकांचा मृत्यू
नेपाळमध्ये संतप्त झालेल्या आंदोलकांनी मंगळवारी पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानाला आग लावून ते पेटवून दिलं. पंतप्रधानांबरोबरच सत्ताधारी गटातील इतरही काही महत्त्वाच्या नेत्यांच्या घरांना अशाच प्रकारे आग लावण्यात आली. सोमवारी आंदोलक व पोलीस प्रशासन यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीमध्ये १९ आंदोलकांचा मृत्यू झाला. त्याचे तीव्र पडसाद आंदोलकांमध्ये उमटले. परिणामी मंगळवारी सकाळपासूनच कर्फ्यू असूनही आंदोलक आक्रमकपणे निदर्शने करत सरकारी मालमत्तांवर हल्ले करताना दिसून आले.