राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा म्हणजे ‘नीट’च्या अंमलबजावणीविरोधात महाराष्ट्रासह आठ राज्यांनी दाखल केलेली फेरविचार याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतली. सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांनी मंगळवारी याप्रकरणी सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे.
वैद्यकीय व दंत वैद्यकीयला जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘नीट’ परीक्षा यंदाच्या वर्षीपासून सक्तीची करण्याचा आदेश गेल्या आठवडय़ात सर्वोच्च न्यायालयाने दिला, तेव्हा केंद्र सरकार आणि वैद्यकीय शिक्षण परिषदेने त्याला न्यायालयात पाठिंबा दिला होता. त्यामुळे ‘नीट’ची सक्ती करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आदी आठ राज्यांचा ‘नीट’ला विरोध असताना त्यांच्याशी सल्लामसलत न करताच केंद्र सरकारने होकार दिल्याने या राज्यांची भूमिका न्यायालयाने धुडकावून लावली. त्यापार्श्वभूमीवर या आठ राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली आहे.
विद्यार्थ्यांना अनेक प्रवेश परीक्षा द्याव्या लागू नयेत, त्यांच्यावर दडपण येऊ नये आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशांमध्ये व प्रवेश परीक्षेतील गैरव्यवहार रोखले जावेत, हा ‘नीट’ सक्तीचा उद्देश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या १३ सदस्यीय घटनापीठाच्या निर्णयाचाही हा महत्त्वाचा भाग आहे. राज्य सरकारची सीईटी त्या निकषांमध्ये बसणारी असल्याने तिच्या आधारेच वैद्यकीय प्रवेश करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neet review modification petition presented by maharashtra govt has been accepted by supreme court
First published on: 02-05-2016 at 11:27 IST