Nepal Gen Z Protest Video : नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. समाजमाध्यमांवरील बंदीबरोबरच भ्रष्टाचार आणि घराणेशाही या मुद्द्यांवरून संतप्त असलेल्या नेपाळमधील Gen Z तरुणांनी मोठं आंदोलन उभे केले. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचेही पाहायला मिळाले. यानंतर नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली आणि राष्ट्रपतींनी राजीनामे दिले आहेत. या Gen Z आंदोलनादरम्यान नेपाळच्या पोखरा शहरातून एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात एक भारतीय महिला भारत सरकारकडे मदतीची मागणी करताना दिसत आहे.
या महिलेने तिचे नाव उपासना दिल असे सांगितले आहे, तसेच तिने दावा केला की, ती स्पामध्ये असताना ती उतरली होती त्या हॉटेलला आंदोलकांनी आग लावली आणि नंतर काठ्या घेऊन ते तिच्या पाठीमागे धावत होते, ज्यामुळे तिला सुरक्षित ठिकामी पळून जावे लागले. तसेच या महिलेने ती व्हॉलिबॉल लिगच्या आयोजनासाठी नेपाळला आल्याचे सांगितले.
महिलेची सरकारकडे मदतीची याचना
“माझे नाव उपासना गिल आहे, आणि मी हा व्हिडिओ प्रफुल्ल गर्ग यांना पाठवत आहे. मी भारतीय दूतावासाला विनंती करते की कृपया आम्हाला मदत करा. जितके लोक आम्हाला मदत करू शकतात, त्यांनी मदत करा. मी येथे नेपाळमधील पोखरा येथे अडकले आहे. मी येथे व्हॉलीबॉल लीग आयोजित करण्यासाठी आले होते, आणि सध्या मी ज्या हॉटेलमध्ये थांबले होते ते जाळण्यात आले आहे . माझे सर्व सामान, माझ्या सर्व वस्तू माझ्या खोलीत होत्या, आणि पूर्ण हॉटेल जाळण्यात आले आहे. मी स्पा मध्ये होते, आणि तेथे लोक मोठ्या काठ्या घेऊन माझ्या मागे धावत होते. मी कशीबशी तेथून जीव वाचवून पळून जाण्यात यशस्वी झाले,” असे ही भारतीय महिला व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहे.
विद्यार्थ्यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या यांदोलनासाठी सोशल मीडियाव घातलेली बंदी हे कारण ठरले. यानंतर हे आंदोलनात सरकारविरोधात आणखीनच भडका उडाला. याच्या माध्यमातून पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले. अखेर दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या निदर्शनांनंतर समाज माध्यमांवर घातलेली बंदी उठवण्यता आली. तरी दुसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणात निदर्शने होत असल्याने ओली यांनी राजीनामा दिला. नेपाळमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जणांचा मृत्यू झाला. पुढे आंदोलकांनी सरकारी इमारतींवर हल्ले केले आणि पार्लमेंटसह अनेक नेत्यांची घरे जाळून टाकली.
उपासना गिल पुढे माहिती दिली की…
“येथील परिस्थिती खूप वाईट आहे. सर्वत्र रस्त्यांवर जाळपोळ होत आहे. येथे पर्यटकांनाही सोडत नाहीयेत. त्यांना काहीही फरक पडत नाही की कोण पर्यटक आहे आणि कोण कामासाठी आले आहे. ते कोणाचाही विचार न करता सगळीकडे आगी लावत आहेत आणि येथील परिस्थिती खूप खूप वाईट झाली आहे. आम्ही दुसऱ्या एका हॉटेलमध्ये किती काळ राहू हे आम्हाला माहीत नाही. पण मी फक्त भारतीय दूतावासाला विनंती करते की कृपया हा व्हिडिओ, हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवावा. हात जोडून मी तुम्हा सर्वांना विनंती करते, कृपया आम्हाला मदत करा. माझ्यासोबत येथे अनेक लोक आहेत आणि आम्ही येथे अडकलो आहोत,” असे गिल पुढे म्हणाली.
भारतीय दूतावासाने काय म्हटले?
दरम्यान, काठमांडूमधील भारतीय दूतावासाने नेपाळमधील सर्व नागरिकांना परिस्थिती स्थिर होईपर्यंत काठमांडू येथे जाणे टाळावे असे आवाहन केले आहे.
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत किंवा मदतीची आवश्यकता असलेल्या नागरिकांसाठी भारतीय दूतावासाने आपत्कालीन संपर्क क्रमांक देखील जारी केला आहे. दुतावासाने दिलेले क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत – 977 – 980 860 2881, 977 – 981 032 6134