Ahmedabad Plane Crash अहमदाबादहून लंडन या ठिकाणी जाणाऱ्या विमानाचा टेक ऑफनंतर लगेचच अपघात झाला. हे विमान कोसळलं आणि अनेकांचा या घटनेत मृत्यू झाला. अनेकांची स्वप्नं आपला माणूस गेल्याने संपलीच. बोईंग 787-8 ड्रीमलायनर या विमानाने लंडनला जाण्यासाठी अहमदाबादच्या विमानतळावरुन उड्डाण घेतलं आणि पुढच्या पाच मिनिटांत अपघात झाला.
प्रत्यक्षदर्शींनी केलं काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेचं वर्णन
बोईंग विमान ज्या ठिकाणी पडलं तिथे धुराचे लोट आणि आगीचे लोळ बराच काळ दिसत होते. तसंच एक भलामोठा आवाजही झाला. प्रत्यक्षदर्शींनी जेव्हा ही घटना पाहिली तेव्हा त्यांच्या काळजाचा थरकाप उडाला. दरम्यान या विमानात ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या अनेक करुण कहाण्या समोर येत आहेत. खुशबू नावाची एक नवविवाहिता याच विमानात होती. खुशबू मुळची राजस्थानच्या बलोतारा जिल्ह्यातली. तिचं लग्न याच वर्षी जानेवारी महिन्यात मनफुल सिंग याच्याशी झालं होतं. तिचा पती लंडनमध्ये शिकतो आहे. ती त्याला भेटण्यासाठी पहिल्यांदाच याच विमानाने लंडनला चालली होती. लग्नानंतर या दोघांची पहिल्यांदाच भेट होणार होती पण त्याआधीच खुशबूचा विमान अपघातात मृत्यू झाला.

राजस्थानची विवाहिता खुशबूचा मृत्यू
राजस्थानचे ११ जण या विमानात होते. त्यापैकीच एक खुशबूही होती. या ११ जणांपैकी दोघंजण हे शेफ म्हणून काम करण्यासाठी चालले होते. दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी विमानाचा अपघात झाला. वैमानिकाने थेट Mayday चा मेसेज दिला. त्यावेळी विमान ८०० फुटांहून अधिक उंचीवर पोहचलं होतं. त्यानंतर ते कोसळलं. याच अपघातात ज्या प्रवाशांचा मृत्यू झाला त्यात खुशबूचा समावेश होता. खुशबू मदन सिंग राजपुरोहित यांची मुलगी होती. ते मूळचे राजस्थानचे आहेत. जानेवारीत खुशबूचं लग्न झालं होतं. लग्नानंतर ती पहिल्यांदाच नवऱ्याला भेटायला चालली होती. मात्र तिचा मृत्यू झाला. ज्यामुळे तिच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
अनेक मृतदेह जळून खाक, ओळख पटवणं कठीण
विमान अपघातामुळे मृतदेह जळून खाक झाले आहेत. अनेक मृतांची ओळख पटणं बाकी आहे. आता डीएनए टेस्टद्वारे मृतांची ओळख पटवली जाईल. मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना, कुटुंबीयांना बोलवून डीएनएद्वारे ओळख पटवली जाईल. गुजरातच्या आरोग्य सचिवांनी सांगितलं की अनेक मृतदेह असे आहेत ज्यांची ओळख पटवणं अगदीच कठीण झालं आहे. अहमदाबाद रुग्णालय, तसंच हॉस्टेल या ठिकाणी जे जखमी झाले त्यांना आम्ही रुग्णालयात आणलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.