सीरियात अध्यक्ष बशर अल असाद यांच्या राजवटीत पुन्हा एकदा या महिन्याच्या सुरुवातीला रासायनिक हल्ला करण्यात आला असून सीरियातील रासायनिक शस्त्रसाठे नष्ट करण्याबाबत करार होऊनही हा हल्ला झाल्याचे समजते.
 अमेरिका व फ्रेंच अधिकाऱ्यांनी सांगितले, की निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सीरियात हे हल्ले करण्यात आले असावेत. सीरियात ३ जूनला अध्यक्षीय निवडणूक होत असून तो एक देखावा (फार्स) आहे, अशी टीका करण्यात येत आहे.  
सीरियात गेली तीन वर्षे रक्तरंजित संघर्ष सुरू असून त्यातून मार्ग निघण्याची चिन्हे नाहीत. या महिन्यात सीरियात क्लोरिनचा मारा करून रासायनिक हल्ला करण्यात आला व विरोधकांचे प्राबल्य असलेल्या काफ्र झिटा भागात हा हल्ला करण्यात आल्याचे व्हाइट हाउसचे प्रवक्ते जे कार्नी यांनी सांगितले.  
असाद हे सीरियात रासायनिक शस्त्रे वापरीत असल्याची माहिती आहे पण पुरावे नाहीत असे रविवारी फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकॉइस ऑलाँद यांनी म्हटले होते. मध्य हामा प्रांतात काफ्र झिटा येथे क्लोरिन वायूचा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात आले. वायव्यकडील इदलिब प्रांतात रासायनिक हल्ले करण्यात आल्याचा काही कार्यकर्त्यांचा दावा आहे. सीरियाने गेल्या ऑगस्टमध्ये दमास्कस नजीक केलेल्या रासायनिक हल्ल्यात शेकडो लोक ठार झाले होते.