डावी चळवळ कालसुसंगतत आहे काय, अशी शंका उपस्थित केली जात असताना या चळवळीला नवीन रूप देण्यासाठी ‘न्यू सोशालिस्ट इनिशिएटिव्ह’ हा एक नवा मंच स्थापन करण्यात आला आहे. हा राजकीय व वैचारिक मंच असून त्यात डाव्या चळवळीची नवीन परिभाषा विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या मंचाचे पहिले अधिवेशन काल दिल्लीत झाले त्या वेळी डाव्या विचारवंतांनी देशातील डाव्या चळवळीची पुढील दिशा ठरवण्याबाबत चर्चा केली.
गतकाळातील चळवळी या तुम्हाला भांडवलवाद व बूझ्र्वा लोकशाही राजवटींविरोधात क्रांती कशी करावी हे सांगत नाहीत, पण नेमकी हीच बाब आता आमच्यापुढे प्रमुख आहे, असे मार्क्‍सवादी सैद्धांती रवी सिन्हा यांनी सांगितले. इतिहासात प्रथमच समाजात भांडवलवादविरोधी व बूझ्र्वा लोकशाहीविरोधी चळवळी विषयसूचीवर आल्या आहेत. मार्क्‍सवादी इतिहासकार जयरस बनाजी यांनी सांगितले की, कामगार क्षेत्रातील भांडवली प्रक्रियेत असलेल्या कामकरी जनतेला रोजच्या जीवनाचे विश्लेषण करण्यास शिकवणे ही डाव्यांची भूमिका आहे. यात कामगार लोकांमधून पक्षाचा उदय होण्यास प्रोत्साहन देणे एवढीच ही भूमिका मर्यादित आहे.
श्रवण व शिकणे या क्षमता विकसित करणे हे कार्य डाव्यांनी करावे, फार थोडय़ा डाव्या पक्षांमध्ये ही क्षमता आहे असे बनाजी, सुभाष गताडे यांच्यासह काही विचारवंतांनी सांगितले. नवीन डाव्या चळवळीची परिभाषा ही विसाव्या शतकातील प्रारूपावर अवलंबून ठेवता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले. पूर्वीच्या सरंजामशाही व वसाहतवादी काळातील चळवळींची पुनरावृत्ती किंवा अनुकरण आजच्या काळात करता येणार नाही. कारण आता शत्रू बदलले आहेत, असे मत व्यक्त करण्यात आले.