लसीकरणावरुन टीका करणाऱ्यांना आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांचं सडेतोड उत्तर; म्हणाले…

या ट्विटच्या एक दिवस आधीच काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी लसीकरणाच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर टीका केली होती

गेल्याच आठवड्यात मोदी सरकारमध्ये सामील झालेले आणि देशाच्या आरोग्यमंत्री पदाचा पदभार स्विकारलेले मनसुख मांडवीय यांनी नुकतंच टीकाकारांना खडे बोल सुनावले आहेत. लसीकरणावरुन टीका करणाऱ्यांना त्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. मांडवीय यांनी आपल्या ट्विटमधून आपली मतं मांडली आहेत.

आपल्या या ट्विटमध्ये मांडवीय म्हणतात, भ्रम आणि चिंतेचं वातावरण पसरवणारी वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. हे नेते शासनप्रक्रिया आणि त्यांच्याशी संबंधित गोष्टींपासून इतके दूर आहेत की त्यांना लसीकरणाबद्दल जी माहिती दिली जाते, त्याबद्दलही काही कल्पना नाही.


ते पुढे म्हणतात, सरकारी आणि खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून लसीकरण व्हावं यासाठी जून महिन्यात ११.४६ कोटी डोस राज्यांना उपलब्ध करुन देण्यात आले तर जुलैमध्ये डोसची संख्या वाढवून १३.५० कोटी करण्यात आली. जुलैमध्ये राज्यांना किती डोस दिले जातील याची माहिती केंद्र सरकारने राज्यांना १९ जूनलाच दिली होती. त्यानंतर २७ जून आणि १३ जुलैला केंद्राने राज्यांना आधीच बरीचशी लसींबाबतची माहिती दिली होती. त्यामुळे राज्यांना हे अगदी व्यवस्थित माहित आहे की त्यांना कधी किती डोस मिळणार आहेत. कोणालाही काही अडचण येऊ नये यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. आता जर केंद्र सरकारने आधीच राज्यांना लसीच्या उपलब्धतेबद्दलची माहिती दिली असेल आणि तरीही अयोग्य व्यवस्थापन आणि लस घेण्यासाठीच्या लांब रांगा अशा समस्या येत असतील तर त्याचं कारण स्पष्ट आहे.

पुढच्या ट्विटमध्ये ते म्हणतात, लसींच्या उपलब्धतेबाबत मला अनेक राज्यांकडून आणि त्यांच्या नेत्यांकडून पत्राद्वारे किंवा चर्चेतून माहिती मिळालेली आहे. त्या आधारावर सगळ्या परिस्थितीचा अभ्यास केला जात आहे. मात्र नेत्यांची अशी निरर्थक वक्तव्य जनतेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी केली जात आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: New health minister of india mansukh mandviya vaccination in india vsk