शरीरात कुठल्याही भागात रक्ताच्या गुठळ्या असतील तर त्या एकाच चाचणीत ओळखण्याची पद्धत वैज्ञानिकांनी विकसित केली आहे. त्यामुळे पक्षाघात आणि त्यामुळे येणारी विकलांगता यांचे प्रमाण रोखता येईल, असा दावा हे तंत्रज्ञान शोधणाऱ्या शास्त्रज्ञांनी केला आहे. रक्ताच्या गुठळ्या शरीराच्या नेमक्या कुठल्या भागात आहेत हे चटकन ओळखणे डॉक्टरांना शक्य नसते. सध्याच्या वैद्यकीय तंत्रामुळे शरीराच्या एकाच भागात एकावेळी त्याचा शोध घेतला जातो. त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या नेमक्या कुठे आहेत याचा शोध घेण्यात विलंब होतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला अचानक पक्षाघात होऊन त्याच्या शरीराचा भाग विकलांग होतो. त्याला पक्षाघाताचा दुसरा झटका येण्याची शक्यताही असते. सुरुवातीची रक्ताची गुठळी फुटते आणि त्यानंतर पक्षाघाताचा मोठा झटका येतो. त्यापूर्वी ती गुठळी शोधून उपचार करणे आवश्यक असते. रक्ताची गुठळी कोठे आहे हे कळले तर त्यानुसार उपचार करता येतात, असे मॅसॅच्युसेटस रुग्णालयातील संशोधक पीटर कारवान यांनी सांगितले. काही वेळा रक्ताची गुठळी काढण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागते. रक्ताची गुठळी शोधण्यासाठी तीन पद्धती वापरतात. त्यात अल्ट्रासाऊंड पद्धतीने कॅरोटिड धमन्या किंवा पायातील रक्तवाहिन्यांत असलेल्या गुठळ्या शोघतात, तर चुंबकीय सस्पंदन प्रतिमाचित्रण (एमआरआय) पद्धतीने हृदयाची तपासणी केली जाते. संगणकीकृती स्थानशास्त्रीय तपासणीने फुप्फुसातील रक्ताच्या गुठळ्या कुठे आहेत हे समजते.
जर गुठळी कुठे आहे हे समजले नाही तर योग्य उपचार करता येणार नाही. अनेक वेळा त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरून प्रयोग करत बसावे लागते, पण तोपर्यंत रुग्णाची स्थिती खालावलेली असते. आता शरीरात कुठेही रक्ताची गुठळी असली तरी ती एकाच तपासणीत कळणार आहे, असे कारवान यांचे म्हणणे आहे.
काय आहे तंत्रज्ञान?
* संशोधकांच्या पथकाने रक्तातील गुठळीत असलेल्या अविद्राव्य अशा फायब्रिन या प्रथिनाला चिकटणारे पेप्टाईड शोधले आहे.
* रेडिओन्युक्लाईड्स पेप्टाईडला जोडले तर शरीरात रेडिओन्युक्लाईस कुठे आहेत हे पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी तंत्राने (पीईटी) शोधता येते.
*  वेगवेगळे रेडिओन्युक्लाईड्स व पेप्टाईड्स यात वापरतात आणि रेडिओन्युक्लाईड व पेप्टाईड्स यांना जोडण्यासाठी वेगवेगळी रसायने वापरली जातात.
*  कुठल्या मिश्रणाने रक्ताच्या गुठळीचे पीईटी संदेश स्पष्ट मिळतील याचा विचार केला जातो. आतापर्यंत १५ रुग्णांच्या रक्तातील गुठळ्यांची तपासणी करण्यात यश आले आहे.
* आधी परीक्षानळीत फायब्रिनला कोणती रसायने जोडता येतात हे तपासण्यात आले. ते प्रयोग अर्थातच उंदरांवर करण्यात आले.
* काही वेळा रक्ताची गुठळी शोधण्यासाठी पेप्टाईड व न्युक्लायईड्सचा पाठवलेला जोड शरीरात तोडला जाण्याची शक्यता असते, पण हा धोका चयापचयाच्या क्रियेशी संबंधित असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New method to detect blood clots anywhere in body
First published on: 19-08-2015 at 02:55 IST