रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ५० रूपयांच्या नव्या नोटेची घोषणा केली असून लवकरच ती बाजारात येणार आहे. ५० रूपयांच्या या नव्या नोटेवर महात्मा गांधींचे छायाचित्र असेल. या नोटेवर बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असेल. आरबीआयने शुक्रवारी एक निवेदन जारी करून नव्या ५० रूपयांच्या नोटेची घोषणा केली. नोटेची अधिकृत घोषणा करण्यापूर्वीच ५० रूपयांच्या नव्या नोटांची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या नव्या नोटेवर देशाचा सांस्कृतिक वारसा दाखवण्यात आला आहे. नोटेच्या मागील बाजूस विजयनगर साम्राज्याची राजधानी हंपीचे छायाचित्र आहे. गतवर्षी डिसेंबर महिन्यातच आरबीआयने लवकरच ५० आणि २० रूपयांच्या नव्या नोटा चलनात येणार असल्याचे जाहीर केले होते.

८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीचा निर्णय पंतप्रधानांनी जाहीर केल्यानंतर ५०० आणि १ हजार रूपयांच्या नोटा चलनात आणल्या गेल्या आहेत. ५०० रूपयांच्या नोटांचा रंग हा साधारण राखाडी रंगाशी मिळताजुळता आहे आणि २ हजारांच्या नोटांना जांभळा रंग देण्यात आला आहे. आता ५० रूपयांची नवी नोट चलनात येणार आहे.

काळ्या पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. ५०० आणि २ हजार रूपयांच्या नव्या नोटानंतर आता ५० रूपये आणि २० रूपयांची नोट कशी असेल हे गुलदस्त्यात होते.

५० रूपयांच्या नव्या नोटेचा रंग हा फिकट निळा आहे. ही नोट आकाराने १३५ मिमी लांब आणि ६६ मिमी रूंद आहे. त्याचबरोबर यामध्ये अनेक डिझाइन आणि पॅटर्न आहेत. जाणून घेऊयात कसा असेल नोटेचा समोरील भाग..

१. नोटेच्या वरील भागात डाव्याबाजूस ५० असे अंकी लिहिलेले असेल. प्रकाशातही हा अंक आरपार दिसेल.

२. देवनागरी भाषेत ५० लिहिलेले आहे.

३. मध्यभागी महात्मा गांधी यांचे छायाचित्र

४. छोट्या अक्षरात ‘RBI’, ‘INDIA’ आणि ‘50’ असे लिहिलेले असेल.

५. नोटेत सुरक्षा धागा असेल ज्यावर भारत आणि RBI असले लिहिलेले असेल.

६. गॅरंटी क्लॉज, गव्हर्नर यांची स्वाक्षरी त्याचबरोबर प्रॉमिस क्लॉज आणि महात्मा गांधींच्या छायाचित्राच्या उजव्याबाजूस आरबीआयचे चिन्ह.

७. उजव्या बाजूस अशोक स्तंभ

८. ५० रूपयांचा वॉटरमार्क

९. नोट क्रमांक पॅनल असेल. यात अंकांचा आकार मोठा होत जाईल.

नोटेच्या मागील भागाचे डिझायन आणि वैशिष्ट्यांबाबत जाणून घेऊयात..

१. नोटेच्या डाव्या बाजूस नोट छपाईचे वर्ष लिहिलेले असेल.

२. स्वच्छ भारतचा लोगो आणि घोषणा

३. विविध भाषांमध्ये ५० रूपये लिहिलेले असेल.

४. हंपीचे छायाचित्र

५. देवनागरी भाषेत ५० रूपये लिहिले असेल.