पृथ्वीपासून ३२० प्रकाशवर्षे अंतरावर असलेल्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या मोठय़ा ग्रहाचा शोध वैज्ञानिकांनी लावला असून त्याची घनचा स्टायरोफोमइतकी आहे. हा ग्रह फुगलेला असून त्याचा फायदा जीवसृष्टी असणाऱ्या ग्रहांचा अंदाज घेण्यासाठी करता येणार आहे, त्यासाठी तेथील वातावरणाच्या चाचण्या घ्याव्या लागतील. हा ग्रह फुगलेला असून त्याचे वस्तुमान गुरूच्या एक पंचमांश आहे पण तो ४० टक्के मोठा आहे. त्याचे वातावरण विस्तृत आहे असे अमेरिकेतील लेहीग विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक जोशुआ पेप्पर यांनी सांगितले.

स्टायरोफोम  हे फुगवलेले पॉलिस्टायरिन असते व ते अन्नाचे कंटेनर तयार करण्यासाठी वापरले जाते. या ग्रहाचा मातृतारा चमकदार असून त्यामुळे या ग्रहाच्या वातावरणाचे मापन सहज शक्य आहे. इतर ग्रहांच्या वातावरणाच्या मापनासाठी हा ग्रह म्हणजे एक सराव प्रयोगशाळा ठरणार आहे. या ग्रहाचे नाव केइएलटी ११ बी असे असून तो ताऱ्याभोवतीच अगदी जवळच्या कक्षेतून फिरत आहे. या कक्षेत फिरण्यास त्याला पाच दिवस लागतात. केइएलटी ११ हा तारा अणुइंधन वापरत असून त्याचे रूपांतर लाल मोठय़ा ग्रहात होत आहे. त्यानंतर तो ग्रह ताऱ्याने वेढला जाईल व पुढील शेकडो दशलक्ष वर्षांत तो तग धरू शकणार नाही.

केइएलटी म्हणजे किलोडिग्री लिटल टेलिस्कोपच्या पाहणीत अ‍ॅरिझोना व दक्षिण आफ्रिका अशा दोन ठिकाणच्या दुर्बिणी वापरण्यात आल्या आहेत. या दुर्बिणी ५० लाख ताऱ्यांची प्रकाशमानता मोजू शकतात. प्रखर ताऱ्यांभोवती फिरणारे ग्रह शोधण्यासाठी केइएलटी प्रकल्प राबवण्यात आला असून केइएलटी ११ बी या ग्रहाचा शोध यात महत्त्वाचा आहे. केइएलटी ११ बी ग्रह फुगण्याचे कारण अजून समजलेले नसले तरी त्यावर चर्चा सुरू आहे. ग्रहावरील रसायने व त्याची वास्तव्ययोग्यता यावर या संशोधनातून मोठा प्रकाश पडणार आहे.