पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१व्या वाढदिवशी, शुक्रवारी दैनंदिन लसीकरणाचा नवा विक्रम झाला आहे. संपूर्ण देशभरात दोन कोटींहून अधिक लसींचे डोस देण्यात आले आहेत. देशात शुक्रवारी रात्री ११ वाजेपर्यंत दोन कोटी ३७ लाख ७३ हजार लसींचे डोस देण्यात आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत देशभर दिल्या गेलेल्या एकूण लसींच्या डोसची संख्या ७९ कोटी १३ लाखांहून अधिक झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त मोदींचा आज ७१वा वाढदिवस असून यानिमित्ताने आपण जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण करुन घेत मोदींना वाढदिवसाची भेट देऊयात असं म्हटलं होतं. त्यानंतर शुक्रवारी लसीकरणाचा नवा विक्रम झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्ताने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करत पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. राहुल गांधींनी अगदी मोजक्या शब्दात मोदींना शुभेच्छा दिल्या होत्या. वाढदिवसाच्या शुभेच्छा मोदी जी, असं चार शब्दांचं ट्विट राहुल यांनी इंग्रजीमधून केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा लसीकरणाबाबत आणखी एक ट्विट केलं आहे.

“यापुढेही २.१ कोटी लसीकरण होणारे अनेक दिवस येवोत. आपल्या देशाला अशाच वेगाची गरज आहे,” असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमधून म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी यांचा शुक्रवारी वाढदिवस होता आणि नेमके त्याच दिवशी लसींच्या डोसचा उच्चांक प्रस्थापित झाला आहे. आतापर्यंत सर्वांत वेगाने लसींचे डोस देण्याची ही पहिलीच वेळ होती. पंतप्रधान मोदी यांना ही वाढदिवसाची भेट आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी ‘‘व्हॅक्सिन सेवा, हॅपी बर्थडे मोदी’’ या हॅशटॅगसह म्हटले होते.

दरम्यान, मोदींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या २१ दिवसीय कार्यक्रमामध्ये १४ कोटी रेशनच्या पिशव्या, ५ कोटी थँक यू मोदीजी पोस्ट कार्ड, नदी स्वच्छता मोहिमेअंतर्गत ७१ जागांवर केलं जाणार काम, सोशल मीडियावरील कॅम्पेनसोबतच करोना लसीकरण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आणि कार्याची माहिती देणाऱ्या सेमिनार्सचं आयोजन करण्यात आलं आहे.