यावर्षीच्या टी-२० ब्लास्ट हंगामासाठी हॅम्पशायरने न्यूझीलंडच्या अष्टपैलू क्रिकेटपटू कॉलिन डी ग्रँडहोमेसोबत करार केला आहे. ग्रँडहोमे स्पर्धेच्या अखेरीस उपलब्ध होईल, अशी शक्यता आहे. घोट्याच्या दुखापतीमुळे ग्रँडहोमे एका वर्षापेक्षा जास्त काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. वेस्ट इंडीज, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतही तो खेळला नव्हता.

गेल्या महिन्यात शस्त्रक्रिया झाल्यानंतर ग्रँडहोमे सरावासाठी मैदानात परतला. जूनमध्ये होणाऱ्या भारताविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी त्याने संघाचा दरवाजा ठोठावला आहे. हासामना १८ जूनपासून सुरू होईल. ग्रँडहोमे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर हॅम्पशायर संघात सामील होईल. २५ जूनपासून सॉमरसेट विरुद्धच्या सामन्यात तो असेल, अशी आशा आहे.

 

मार्च २०२०मध्ये ग्रँडहोमेने भारताविरुद्ध अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. २०१७ आणि २०१८मध्ये त्याने बर्मिंगहॅम बेअर संघाकडून टी-२० ब्लास्टमध्ये क्रिकेट खेळले होते. तो इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आणि कॅरिबियन प्रीमियर लीगसारख्या विविध टी-२० लीगमध्ये सहभागी झाला होता. आयपीएलमध्ये तो कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून सामने खेळला आहे. यातील २५ सामन्यात त्याने ३०३ धावा जमवल्या आहेत.

टी-२० ब्लास्ट ९ जूनपासून सुरू होईल. या स्पर्धेत १८ जूनपर्यंत लीग सामने खेळले जातील. यानंतर, पाच आठवड्यांची विंडो ठेवली गेली आहे ज्यामध्ये कोणताही सामना होणार नाही. यानंतर, २४ ऑगस्टला पुन्हा संघ बाद फेरीत खेळण्यासाठी येतील. १८ सप्टेंबर रोजी दोन्ही उपांत्य फेरी आणि अंतिम सामना होईल. म्हणजेच एका दिवसात तीन सामने होतील.