ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी काही दिवसांपूर्वीच लवकरच देशातील लॉकडाऊन टप्प्याटप्प्यात मागे घेण्यात येण्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी करोनाची साथ संपलेली नसून रुग्ण यापुढेही सापडत राहतील असं सांगतानाच आता करोनासोबत जगायला शिकलं पाहिजे असं म्हटलं आहे. अशाप्रकारे  करोनासोबत जगण्याचं धोरण स्वीकारणारा ब्रिटन हा पहिलाच देश नसून यापूर्वी सिंगापूरनेही हे धोरण स्वीकारलं आहे. मात्र या धोरणानुसार न्यूझीलंडमध्ये निर्बंध शिथिल केले जाणार नाहीत असं देशाच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन यांच्या प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. ब्रिटनने घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडमध्येही हेच धोरण स्वीकारण्याची शिफारस आर्डेन प्रशासनाने फेटाळलीय.

न्यूझीलंडमधील आर्डेन प्रशासनाचं म्हणणं काय?

ब्रिटनप्रमाणे आम्ही करोनासोबत जगा धोरणानुसार सर्वकाही खुलं करण्याचा विचारात नाहीत, असं आर्डेन यांच्या मंत्रीमंडळातील करोनासंदर्भातील मंत्रालय पाहणाऱ्या ख्रिस हिपकिन्स यांनी सांगितल्याचं गार्डियनने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. एका पत्रकार परिषदेमध्ये पंतप्रधानांसोबत असतानाच ख्रिस यांनी हे वक्तव्य केलं आहे. ब्रिटनच्या धोरणांबद्दल बोलताना ख्रिस यांनी, एक गोष्ट ब्रिटन सरकारच्या धोरणांवरुन स्पष्ट होत आहे ही सर्वकाही खुलं केल्यानंतर करोना रुग्णांची संख्या वाढणार. कदाचित दिवसाला हजारो रुग्ण आढळून येतील आणि मृत्यूचं प्रमाणही वाढेल, असं म्हटलं आहे. अचानक एखाद्या सकाळी उठून आपण कोव्हिडच्या आधी जीवनशैली होती तशी सुरुवात करुयात असं करताना येणार नसल्याचंही ख्रिस म्हणाले. करोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवणाऱ्या आघाडीच्या देशांमध्ये न्यूझीलंडचा समावेश आहे. असं असतानाही त्यांनी सावध पावलं उचलण्याचा निर्णय घेतलाय. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार न्यूझीलंडमध्ये करोनामुळे २६ जणांचा मृत्यू झालाय.

नक्की वाचा >> करोनासोबत जगा… ना आकडेवारी जाहीर करणार ना निर्बंध; करोनाला सर्दी-पडश्याप्रमाणे ट्रीट करण्याचा ‘या’ देशाचा निर्णय

आमच्यासाठी हे फार महत्वाचं : आर्डेन

करोना मृत्यांसंदर्भात विचारण्यात आलं असता आर्डेन यांनी, प्रत्येक देशाची भूमिका वेगळी असल्याचं सांगितलं. आम्ही पुढील वाटचाल कशी करतो आणि जास्तीत जास्त लोकांना यापासून कसं वाचवतो हे आमच्यासाठी जास्त महत्वाचं आहे. जगामधून हा विषाणू अजून संपलेला नाही असंही आर्डेन म्हणाल्या. तसेच ब्रिटनमध्ये सगळं अनलॉक झाल्यानंतर परिस्थितीचा आढावा आणि रुग्णसंख्या लक्षात घेऊन तेथील लोकांना येथे प्रवेश द्यायचा, विमानसेवा सुरु ठेवायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल, असंही आर्डेन प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

नक्की वाचा >> समजून घ्या : लस घेतल्यानंतर नक्की किती दिवसांनी करोना संसर्गाचा धोका कमी होतो

ब्रिटन नक्की काय करणार आहे?

ब्रिटनमध्ये १५ जुलैपासून टप्प्याटप्प्यात लॉकडाउनचे निर्बंध शिथील करण्यात येणार आहे. यासंदर्भातील वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहे. १९ जुलैपासून टाळेबंदी पूर्णपणे मागे घेतली जाईल असं ब्रिटनचे आरोग्यमंत्री साजीद जावीद यांनी संसदेमध्ये म्हटलं आहे. १२ जुलैरोजी यासंदर्भात प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. लॉकडाउनचा हा ब्रिटनधील शेवटचा टप्पा असेल आणि नंतर लॉकडाउन करण्यात येणार नाही असं जॉन्सन म्हणालेत. आमच्या राष्ट्रीय आरोग्य व्यवस्थेने वेगाने लसीकरण करून मोठय़ा प्रमाणात प्रगती साधली आहे. ४ टप्प्यांत लोकांचे स्वातंत्र्य त्यांना पुन्हा कसे बहाल करता येईल याचा विचार करता येईल. असे असले तरी ही साथ अजून  संपलेली नाही. ती काही दिवस राहील, रुग्णही सापडत राहतील यात शंका नाही. आपण आता विषाणूसमवेत राहायला शिकलो आहोत. कोविड काळातील जोखीम टाळणे त्यासाठी महत्त्वाचे आहे, त्यासाठी कुठलेही निष्कर्ष घाईने काढणे चुकीचे ठरेल, असंही जॉन्सन म्हणालेत.

नक्की वाचा >> Explained: संसर्गाची लाट म्हणजे काय? ती कशी येते? तिसरी लाट टाळता येणं शक्य आहे का?

दक्षिण कोरियात निर्बंध शिथिल केल्याचा फटका

सोल : दक्षिण कोरियात करोनाचे आणखी ७११ रुग्ण सापडले असून राजधानी क्षेत्रात त्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यातील साथीमध्ये दक्षिण कोरियाने चांगली कामगिरी केली. आता लागोपाठ तिसऱ्या दिवशी सातशेवर रुग्ण सापडले असून जानेवारीपासून ही सर्वात मोठी वाढ होत आहे. कोरिया रोग नियंत्रण व प्रतिबंधक संस्थेने सांगितले की, सोल महानगर प्रदेशात ५५० रुग्ण सापडले असून बहुदा अधिकाऱ्यांनी सामाजिक अंतर व इतर उपायांवर दिरंगाई केली असण्याची शक्यता आहे. बुसान, दाजेऑन, गेयाँघसँग प्रांतातही रुग्ण सापडले आहेत. मोठय़ा प्रमाणात लोक एकत्र जमण्याची परवानगी सरकारने दिली त्यामुळेच ही रुग्णवाढ झाली असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. पंतप्रधान किम बू क्यूम यांनी रविवारी या प्रश्नावर बैठक घेऊन प्रतिबंधात्मक आदेश कडक करण्याचे आदेश दिले. त्यांनी सोल येथे शनिवारी कामगार संघटनांनी सरकार विरोधी मोर्चावर टीका केली आहे. लोकांनी एक त्र जमू नये असे सांगूनही हा मोर्चा काढण्यात आला. सरकारने जुलैच्या सुरुवातीपासून निर्बंध शिथिल केले होते, त्याचा फटका बसला आहे.