आपला पती देखणा नाही म्हणून २२ वर्षीय नवविवाहितेनी त्याची डोक्यात दगड घालून हत्या केली. ही घटना तामिळनाडूच्या कडलोर या जिल्ह्यात घडली. लग्न झाल्यापासून ती आपल्या पतीवर नाराज होत असे. माहेरच्या लोकांनी आपले लग्न बळजबरीने लावून दिले असे तिच्या मनात घोळत असे.
त्यातूनच तिला तिच्या मैत्रिणी म्हणत असत तू तुझ्या पतीपेक्षा चांगली दिसते. त्यामुळे तिच्या मनात पती विषयी तिरस्कार निर्माण होऊ लागला. त्यातून त्यांचे सतत भांडण होऊ लागले होते. तिचा पती व्यवसायाने काष्ठ शिल्पकार होता. काल रात्री कामावरुन परतल्यानंतर त्यांच्या दोघांमध्ये वाद झाला आणि त्याचे रुपांतर भांडणात झाले त्यातूनच तिने त्याची डोक्यात दगड घालून हत्या केली.
हत्या केल्यानंतर ती पोलिसांकडे गेली आणि तिने आपल्या पतीची कुणीतरी हत्या केली आहे असे म्हटले. पोलिसांनी तिला भरपूर प्रश्न विचारल्यानंतर तिने कबुली दिली की मीच माझ्या पतीची हत्या केली. माझे पती दिसायला चांगले नव्हते. माझ्या माहेरच्या लोकांनी त्याचे माझ्याशी बळजबरी लग्न लावून दिले होते असे देखील तिने सांगितले.
ते दिसायला चांगले नव्हते त्यामुळे मैत्रिणी माझी नेहमी थट्टा करत असत असे ती म्हणाली. त्यामुळेच चिडून मी हे कृत्य केले असे तिने पोलिसांना सांगितले. त्या नवविवाहितेला अटक करण्यात आली असून तिला आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.